राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठी येत्या २३ मार्च रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातून एकूण सहा सदस्यांची मुदत संपत आल्याने निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे.
महाराष्ट्रातून वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), राजीव शुक्ला (काँग्रेस), अजयकुमार संचेती (भाजपा) या राज्यसभा सदस्यांची मुदत संपत आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी भाजपाकडून नवे चेहरे दिले जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून राजीव शुक्ला यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. शिवसेनेकडून अनिल देसाई यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर राष्ट्रवादीकडून नवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार दिले जातील. उमेदवार देताना सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून होण्याची शक्यता आहे.