सीएसटी - भाजपा सरकारने नोटबंदी केल्यामुळे राज्यातील लाखो कंत्राटी कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत भाजपा विरोधी मतदान करून फडणवीस सरकारचा पराभव करावा असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सह निमंत्रक विश्वास उटगी यांनी केलं आहे.
राज्यात भाजपा सरकारने कामगार कायदा सुधारणेच्या नावाखाली नवीन 20 मुद्द्यांचा कायदा करून कंत्राटी कामगारांना मालकांचे गुलाम बनवले आहे. 2 नोव्हेंबर रोजी भारतव्यापी संप केला मात्र त्या संपाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. सरकारने कामगार संघटनांशी चर्चा न करता कामगार कायद्यात बदल चालू ठेवले आणि 5 जानेवारी 2017 रोजी महाराष्ट्र सरकारने कंत्राटी कामगारांना त्यांचे सर्व कायदेशीर हक्क हिरावून घेणारा कायदा नोटीफिकेशन द्वारे जाहीर केला. यामुळे येत्या 17 फेब्रुवारीला आझाद मैदानात महाधरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी यांच्या फेडरेशन, बँक, विमा, पोस्ट ट्रस्ट, माथाडी कामगार, शिक्षक आणि प्राध्यापक, घरेलू कामगार, अंगणवाडी, आशा, ग्रामसेवक इत्यादी कामगार संघटना सहभागी होणार असल्याचे उटगी यांनी सांगितले. तसेच येत्या 9 मार्च रोजी मुंबई आणि महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार असून, मुंबईमध्ये राणीबाग या ठिकाणी अंदाजे एक लाख लोक जमण्याची शक्यता आहे.
कंत्राटी कामगाराला अंदाजे 18 हजार रूपयांपेक्षा कमी वेतन देऊ नये आणि किमान बोनस 8.33 टक्के मिळाला पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे उटगी यांनी सांगितले.