Advertisement

Mutual Fund भाग १ : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? जाणून घेऊया म्युच्युअल फंडाविषयी

शेअर बाजाराच्या (share market) चांगल्या कामगिरीमुळे बँक, पोस्ट आदींमधील गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडांमधून (mutual fund) मागील २० वर्षांमध्ये मोठा परतावा मिळाला आहे.

Mutual Fund भाग १ : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? जाणून घेऊया म्युच्युअल फंडाविषयी
SHARES

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाचा (mutual fund) आता अनेक जण विचार करू लागले आहेत. मात्र, ही गुंतवणूक कशी करावी, कोणते फंड निवडावेत याचं ज्ञान अनेकांना नसतं. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बुडून नुकसान होते, यामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे खूप अवघड असते, असाही काहींचा गैरसमज असतो. त्यामुऴे इतर गुंतवणूक योजनांपेक्षा खूपच अधिक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या म्युच्युअल फंडांपासून सर्वसामान्य गुंतवणूकदार लांब आहे. मात्र, भविष्यकाळाचा विचार करता म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्कृष्ठ माध्यम आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारात करण्यात येते. त्यामुळे शेअर बाजारातील वाढीचा फायदा या फंडांना होतो. अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची असते. मात्र, शेअर बाजाराचं ज्ञान नसल्याने त्यांना गुंतवणूक करता येत नाही.अशा लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून शेअर बाजारातील वाढीचा फायदा घेता येऊ शकतो. म्युच्युअल फंडाचेतज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडमधील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतात. त्यामुऴे यामधील गुंतवणूक बुडते हा गैरसमज गुंतवणुकदारांनी काढून टाकायला हवा.

भारतात १९६४ मध्ये सरकारच्या सहभागाने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना झाली. युनिट ६४ असं या योजनेचं नाव होतं. भारतातील हीच पहिली म्युच्युअल फंड कंपनी. त्यानंतर सार्वजनिक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापन करण्याची परवानगी १९८६ मध्ये सरकारने दिली. त्यानंतर अनेक बँकांनी म्युच्युअल फंड योजना आणल्याम्युच्युअल फंड योजनांना मिळणारा प्रतिसाद पाहून १९९३ मध्ये खाजगी क्षेत्राला म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर म्युच्युअल फंड क्षेत्राचा वेगाने विस्तार झाला. गुंतवणुकदारांना गुंतवणुकीचा एक मोठा पर्याय मिळाला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणामुळे अनेक परदेशी निधी कंपन्यांची म्युच्युअल फंड क्षेत्रात गुंतवणूक वाढली.


सार्वजनिक बँका, खासगी बँका, खासगी कंपन्यांनी मुच्युअल फंड कंपन्या स्थापन केल्या आहेत. या म्युच्युअल फंड कंपन्यांनी अनेक योजना बाजारात आणल्या आहेत. जेव्हा म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत असतात. अशा शेकडो गुंतवणूकदारांची गुंतवणूक या योजनेत होते. या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपये जमा होतात. हीच गुंतवणूक त्या योजनेचा फंड मॅनेजर शेअर बाजारात गुंतवतो. शेअर बाजारात विविध क्षेत्रातील चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणुकदारांचे है पैसे गुंतवले जातात. त्यामुळे दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळतो.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकदाराला गुंतवणूकीच्या बदल्यात युनिटस  दिले जातात. उदा. तुम्ही एखाद्या योजनेत १ हजार रुपये गुंतवले आहेत आणि त्या म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किमत १० रुपये आहे. तर तुम्हाला १०० युनिट मिळतील. या युनिटच्या किमतीला एनएव्ही (NAV) म्हटलं जातं. म्हणजे या फंडाचा एनएव्ही १० रुपये असेल. तुमच्या फंडाने ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या शेअर्सची किमत वाढल्यानंतर आपोआपच तुमच्या फंडाचं मूल्यही वाढेल. त्यामुळे तुमची एनएव्हीही चांगलीच वाढेल. रोजच्या रोज सायंकाळी म्युच्युअल फंडाचा एनएव्ही जाहीर केला जातो. त्यामुळे आपल्या फंडाच्या  एका युनिटची किती किमत आहे हे रोज तुम्हाला समजते.

शेअरबाजार वर गेला की NAVवाढतो. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीचे मूल्यही वाढते. शेअर बाजार खाली आला की NAV कमी होतो. त्यामुळे तुमच्या युनिटची किमतही कमी होते. मात्रयामुळे गुंतवणुकदारांनी घाबरून जाण्याचे काही कारण नसते. कारण शेअर बाजारात नेहमी चढ-उतार होत असतात. त्यामुळे म्युच्युअल फंडातील आपली गुंतवणूक वाढत किंवा घटत असते. पण दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वाढ होतेच. त्यामुळे दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला चांगला फायदा होतो. काही गुंतवणूकदाराचं म्हणणं असतं की, जर शेअर बाजार सातत्याने खालीच आला तर म्युच्युअल फंडातील सर्वच पैसे बुडतील. मात्र, शेअर बाजाराचा इतिहास बघितला असता शेअर बाजार दीर्घ मुदतीत वरच गेला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने दरवर्षी १५ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. १९७९ साली १०० अंकांनी सुरू झालेला सेन्सेक्स आज ३७ हजारांच्या आसपास आहे. यावरून लक्षात येईल की शेअर बाजाराने किती मोठी वाढ नोंदवली आहे.

शेअर बाजाराच्या या चांगल्या कामगिरीमुळे अन्य गुंतवणूक योजनांपेक्षा म्युच्युअल फंडांमधून आतापर्यंत चांगला परतावा मिळाला आहे. मागील १५ ते २० वर्षांमध्ये तर शेअर बाजाराची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिलेली आहे. २००८ साली आलेल्या आर्थिक मंदीमध्ये शेअर बाजारात मोठी चढउतार राहिली. मात्र त्यानंतर शेअर बाजाराचा आलेख चढताच राहिला आहे. मागील २० वर्षाचा विचार केला असता बँक, पोस्ट आदींमधील गुंतवणुकीपेक्षा शेअर बाजारातील गुंतवणुकीने मोठा परतावा दिला आहे. त्यामुळे शेअर बाजाराच्या या वाढीचा फायदा गुंतवणुकादारांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून घेता येऊ शकतो.



हेही वाचा  -

शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक

शेअर बाजाराविषयी अनाठायी भीती




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा