Advertisement

काँक्रिटच्या जंगलात गुदमरतोय आदिवासी

जगाच्या पाठीवर ज्या माणसानं, ज्या जिवानं पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिवासी. परंतु तोच आदिवासी जगाच्या पाठीवरून दूर फेकला जात आहे. आदिवासी दिनानिमित्त जाणून घेऊयात या निसर्गाच्या राज्याची होणारी घुसमट...

काँक्रिटच्या जंगलात गुदमरतोय आदिवासी
SHARES

देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता

देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता?


जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई

जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई

झाडं तुम्ही तोडून टाकता, त्याग आम्हा काय मागता

देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता?

झोपडीत दिवा नाही, उजेड आमच्या गावा नाही

डोळ्यादेखत उजेड चोरीता त्याग आम्हा काय मागता

देशभक्त लोक तुम्ही ना, त्याग आम्हा काय मागता?

आम्हीच त्याग करायचा का नेहमी? हा आक्रोष आहे गोरेगावात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा... खरं तर आदिवासी लोक गीतातील हे शब्द कडवे असले तरी तितकेच खरे आहेत. आदिवासी म्हणजे आधीपासून त्या जागी निवास करणारा, असा होतो. मग या जगाच्या पाठीवर ज्या माणसानं, ज्या जीवानं पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिवासी. परंतु तोच आदिवासी जगाच्या पाठीवरून दूर फेकला जात आहे. पाणी, जंगल, जमिनीवर त्यांचा अधिकार, प्राचीन भाषा, प्राचीन संस्कृती, प्राचीन कला देखील त्यांच्याच. पण, आज आदिवासींचे अस्तित्वच संपवण्याचं एकप्रकारे षडयंत्र आखलं जात आहे की काय असा प्रश्न पडावा.

आदिवासी या भूमीवरचे मुलनिवासी. पण या भूमिपुत्रांनाच विकासाच्या नावाखाली हुसकावून लावलं जातंय. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील आरे भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. या पाड्यातील आदिवासींचं पुर्नवसन करण्याचा घाट घातला आहे. पण आम्ही मातीतील माणसं, काँक्रिटच्या जंगलात कसं राहणार? असं म्हणत या पुनर्वसनाला आदिवासींनी विरोध केलाय


क्राँकिटच्या जंगलात जीव घुसमटतो

आरेतील प्रजापूरपाडा इथल्या आदिवासींना झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजनेअंतर्गत अंधेरीच्या चकालामधल्या एका इमारतीत हलवण्यात आलं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं डेपो आणि शेड बांधण्यासाठी २६ हेक्टर जागेचा ताबा घेतला. पाड्यातील घरं पाडायच्या आधी योग्य ती कागदपत्रं देऊन झोपु योजनेअंतर्गत येणाऱ्या घरांचा ताबा त्यांना देण्यात आला होता. पण रहिवाशांनी पाड्यातील घरं खाली करण्यास नकार दिला. तेव्हा एप्रिल २०१७ मध्ये त्यांना घरं खाली करण्यासाठी ७२ तासाचा अवधी देण्यात आला. ७२ तासानंतरही घरं खाली केली गेली नाहीत तेव्हा बळाचा वापर करून रहिवाशांची हकालपट्टी करण्यात आली


आदिवासींवर बळजबरी

दुसरा काहीच पर्याय नसल्यानं प्रजापूरपाड्यातील रहिवाशांना अखेर झोपु अंतर्गत मिळालेल्या घरांचा आधार घ्यावाच लागला. पण या काँक्रीटच्या जंगलात त्यांचा जीव गुदमरतोय. अख्खं आयुष्य शेतीत, झाडा-पानात, निसर्गाच्या सान्निध्यात गेलं. आता झोपु इमारतीत रहायला आल्यापासून शारीरीक आणि मानसिक त्रास त्यांना जाणवू लागला आहे. पिंजऱ्यात कैद असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे

- प्रकाश भोईर, कार्यकर्ते, आदिवासी हक्क संवर्धन समिती


आर्थिक परिस्थिती हलाखीची

प्रजापूरमधल्या रहिवाशांना त्यांच्या मूळ जागेतून हिसकावून दिल्यानंतर कुटुंबियांच्या आर्थिक कमाईत प्रचंड घट झालीय. विस्थापित झालेली बरीच कुटुंबं मोसमी भाज्या आणि फळं पिकवून स्वत:चा गुजराण करणारी होती. घरच्यासाठी ते तूर, मूग आणि तांदूळ पिकवत होते. इमारतीमध्ये विस्थापन झाल्यानं एकप्रकारे त्यांच्या उपजीविकेचं साधनच काढून घेतल्यासारखं झालंय. पाड्यात राहत असताना पिढीजात जमिनीत शेती करून कुटुंबाची गाडी धकलणारे आज एखाद्या छोट्या-मोठ्या कंपनीत रोजंदारीवर काम करतात.

"आम्ही आदिवासी आहोत. जमीन म्हणजे आमच्यासाठी कमाईचा आणि जगण्याचा स्रोत आहे. हे जंगल आमच्यासाठी सर्वकाही आहे. उंच इमारतींमध्ये विस्थापित केल्यानंतर आम्ही शेती कशी करणार? मातीत आणि खुल्या वातावरणात लहानाचा मोठा झालेला आदिवासी इमारतीच्या चार भिंतीत कसा काय जगू शकेल?” असा प्रश्न प्रकाश भोईर यांनी उपस्थित केला




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा