कार्मेल स्पोर्ट्स कमिटीने आयोजित केलेल्या 'रिक्क हॉकी टुर्नामेंट 2017' स्पर्धेत मंगळवारी महिला विभागातील पहिल्या फेरीत फ्रेंन्ड्स एससी विरुद्ध हॉकी लव्हर यांच्यात वांद्र्यातील माऊंट कार्मेल चर्च मैदानात लढत झाली. सामन्यात फ्रेंड्स एससीने लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत फ्रेंड्स एससीने हॉकी लव्हरला 3-2 अशा फरकाने हरवले.
पहिल्या अर्ध्या वेळात फ्रेंडस एससीच्या ममता पासी, मीनाक्षी अगरवाल आणि भाग्यश्री अग्रवाल या तिघींनी प्रत्येकी एक गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर हॉकी लव्हर संघातील अंजली टप्पू हिने दोन गोल केले. तिला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.
तत्पूर्वी झालेल्या सी व्ह्यू एससी विरुद्ध वाइव्हचॅन्सन्स एससीमध्ये झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात सी व्ह्यूने 3-1 अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला. सी व्ह्यू एससीच्या अक्षया रेफीना 2 गोल, तर पल्लवीने 1 गोल करत संघाच्या विजयाला हातभार लावला, तर वाइव्हचॅन्सन्सच्या चैत्राली गावडेने एक गोल केला.