रिदमिक जिम्नॅस्टिक्सची आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा सर्वोत्तम दर्जा प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेती अक्षता शेटे हिला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विशेष सत्कार करून गौरविले. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ आणि शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत चार वेळा प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या अक्षता शेटे हिने राष्ट्रीय स्पर्धेत 23 सुवर्ण, 18 रौप्य आणि 13 कांस्य पदके पटकावली आहेत. सर्वाधिक उच्च दर्जा मिळवणारी अक्षता ही पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक्सची पंच ठरली आहे. पारितोषिक वितरण समारंभात तायक्वांदो राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती पूजा चतूर्वेदी, राज्य अॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता तन्मय घाणेकर, आंतर महाविद्यालयीन ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक विजेता गणेश यादव, जसप्रित कौर, तायक्वांडो राष्ट्रीय आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती छाया सरगर, आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती समृद्धी पवार, आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती ऐश्वर्या शिंदे, आंतर महाविध्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती स्नेहल खुळे आदी खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला.