मुंबईच्या मनोहर विचारे प्रतिष्ठानचे संस्थापक अजय विचारे यांनी यंदाच्या मराठी गौरव पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली असुन त्यात क्रीडा पत्रकार जान्हवी मुळे (चंद्रशेखर संत स्मृती पुरस्कार) तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डीप़ट्टू लता भगत (बाळाराम नाखवा स्मृती पुरस्कार), आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो खेळाडू सायली गुडेकर, बुद्धिबळपटू पर्णाली धारीया आदी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंचा समावेश आहे. देशी खेळांचा विदेशात प्रचार-प्रसार करणाऱ्या शिवाजी पार्क, दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराचा आदर्श संस्था म्हणून तर बुजूर्ग बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
येत्या 23 एप्रिलला होणाऱ्या या कार्यक्रमात बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, राजेंद्र नरवणकर, नगरसेवक तसेच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अनुपमा केदार, अर्जुन पुरस्कार विजेती कबड्डीपटू माया आक्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय कबड्डीपटू छाया शेट्टी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता गिरगावमधील कोकणस्थ वैश्य समाज सभागृह येथे होणार आहे.