कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारनं काही दिवसांपूर्वी आरोग्य सेतु मोबाइल अॅप सुरू केलं होतं. आता या मोबाइल अॅपनं एक नवीन विक्रम तयार केला आहे. अवघ्या १३ दिवसांत ५ कोटी लोकांनी आरोग्य सेतु मोबाइल अॅप डाउनलोड केलं आहे. यासह, आता हे अॅप जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेल्या अॅप्सच्या सूचीमध्ये समाविष्ट झालं आहे. नीती (NITI) आयोगाच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
NITI आयोगाच्या अहवालानुसार १३ दिवसात ५० दशलक्ष म्हणजेच ५ कोटी लोकांनी आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याच्या २४ तासांच्या आत हे अॅप ११ दशलक्ष वापरकर्त्यांनी डाउनलोड केलं. वास्तविक, पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना आरोग्य सेतु मोबाइल अॅप डाउनलोड करण्याचं आवाहन केलं होतं. मोदींनी केलेल्या आवाहनामुळे आतापर्यंत ५ कोटी लोकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये कोरोना व्हायरस ट्रॅकिंग अॅप डाउनलोड केलं आहे, असंही मानलं जातं आहे.
आरोग्य सेतु मोबाईल अॅपनं पोकिमॉन गो गेमिंग अॅपचा रेकॉर्ड तोडला आहे. २०१६ मध्ये, पोकिमॉन गो गेमिंग अॅप १९ दिवसात ५० दशलक्ष वापरकर्त्यांनी डाउनलोड केलं होतं.
आरोग्य सेतु अॅप कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी डिझाइन केला आहे. आरोग्य सेतू अॅप लोकांना सांगेल की, तुम्ही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला आहात की नाही. याशिवाय या अॅपद्वारे कोरोना इन्फेक्शनचा किती धोका आहे? हे देखील आपणास कळू शकेल.
आरोग्य सेतु अॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठी यासह ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अॅपमध्ये कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतीही नमूद केल्या आहेत. या व्यतिरिक्त, आपल्या प्रवासाच्या हिस्ट्रीनंतर आणि मुळात राहत असलेल्या जागेवरून कोरोना संक्रमणाचा धोका आहे की नाही हे अॅप आपल्याला सांगेल.
हेही वाचा