भारतात राहण्यासाठी सर्वात चांगलं अाणि सुरक्षित शहर म्हणून मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर अालं अाहे. भारतात राहण्यासाठी योग्य असलेल्या शहरांची यादी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली अाहे. या यादीत देशातील राहण्यास सर्वोत्तम असलेल्या १० शहरांच्या यादीत पुणे शहरानं पहिला क्रमांक पटकावला अाहे. त्यानंतर दुसरा अाणि तिसरा क्रमांक नवी मुंबई अाणि मुंबईचा अाहे.
शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार, गृहनिर्माण, मोकळ्या जागा, वाहतूक, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सेवा सुविधा तसेच प्रशासन आदी बाबींमध्ये मुंबई राहण्यास सुरक्षित असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने काढला आहे. याबाबत केलेल्या सर्वेक्षणात मुंबई शहर राहणीमानाबाबतच्या जीवनस्तर निर्देशांकात अग्रेसर असून संपूर्ण देशांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरांमध्ये मुंबईनं प्रथम क्रमांक पटकावला अाहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रथमच जीवनस्तर निर्देशांक ठरवण्यासाठी संपूर्ण देशभरातील १११ शहरांशी संबंधीत विविध बाबींचे अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आलं होतं. 'जीवनस्तर निर्देशांक २०१८' (Ease of Living Index 2018) निर्धारित करण्यासाठी देशभरातील शहरांमधील विविध बाबींचा सर्वस्तरीय व सर्वंकष अभ्यास करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शहरातील संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक व भौतिक बाबींशी संबंधीत १५ बाबींचा अभ्यास करण्यात आला.
प्रशासन, शिक्षण,आरोग्य, सुरक्षा, रोजगार, गृहनिर्माण, खुल्या जागा, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्रदुषण नियंत्रण इत्यादी बाबींचा या सर्वेक्षणात समावेश होता. त्याचबरोबर या बाबींशी संबंधीत विविध ७८ बाबी वा घटकांचाही अभ्यास या निर्देशांक निर्धारणात करण्यात आला होता, अशी माहिती यासंबंधीच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. या सर्वेक्षणात मुंबई हे देशातील ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणा-या महानगरांमध्ये सर्वोत्तम महानगर ठरले असून सर्व १११ शहरांमध्ये मुंबई महापालिकेचा देशात तिसरा क्रमांक आला आहे.
मुंबई शहर हे राहण्यास किती योग्य आहे, याबाबतचं जीवनस्तर निर्देशांक सर्वेक्षण हे प्रथमच केंद्र सरकारच्यावतीनं करण्यात आलं आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्यावतीनं ८० टक्के कामांची माहिती पुरवण्यात आली होती. याशिवाय म्हाडा, एमएमआरडीए, रेल्वे आदींकडून माहिती उपलब्ध करून दिली होती. या सर्व माहितींची शहानिशा करून केंद्र सरकारच्या या पथकाने मुंबईची निवड केली आहे. प्रशासनात महापालिका थोडीफार कमकुवत आहे. त्यामुळे यामध्ये लवकरच सुधारणा केली जाईल, असं अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केलं.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई महापालिकेला 'स्वच्छता सर्वेक्षण २०१८' या सर्वेक्षणांतर्गत राज्यांच्या राजधानीच्या गटात देशभरात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर आता 'जीवनस्तर निर्देशांक २०१८' अंतर्गत देखील मुंबई महापालिकेने आपला अग्रक्रम अबाधीत राखल्याने महाराष्ट्राच्या राजधानीच्या गौरवात अधिक भर पडल्याचं सिंघल यांनी स्पष्ट केलं.
मुंबईकरांना विविध सेवा सर्वोत्तम पद्धतीने देण्यासाठी महापालिका दीर्घकालीन व अल्पकालीन नियोजनाद्वारे सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्यातही याच समर्पित भावनेने महापालिका कार्यरत राहील. हा सन्मान मुंबईकरांचा आणि बृहन्मुंबई महापालिकेचा गौरव आहे, अशी भावना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हा गौरव कुणी केला असा सवाल केला अाहे. ही मुंबई दुघर्टनांचं शहर म्हणूनच ओळखलं जात आहे. इथं कुणीही सुरक्षित नसून कधी पाणी भरणं, तर कधी पुल कोसळून, तर कधी झाड पडून तर कधी खड्डयात, गटारात पडून लोकांचे जीव जात आहेत. पायाभूत सुविधांच्या नावानं बोंब आहे. हागणदारीमुक्त मुंबई जाहीर झाली. पण रस्त्यांवर बसणारे काही कमी झालेले नाही, असं सांगत रवी राजा यांनी हे सर्व संशयास्पद असल्याचं सांगत या सर्वेक्षणावरच शंका उपस्थित केली.
हेही वाचा -
इंजिनिअरींग विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्रासाठी मुदतवाढ
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांकडून वेगमर्यादेचं उल्लंघन; १३ हजारांचा दंडही बाकी