महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लोकसंगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चात्य संगीताच्या आक्रमणात इथल्या मातीत घट्ट रुजलेलं लोकसंगीत अस्तंगत होतंय की काय? असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती. पण अभिजात कलेला मरण नसतं. हेच उदाहरणातून सिद्ध करण्याचं काम लोकरंग 2017 टीमने करून दाखवलं आहे.
लोकसंगीताच्या नावाने टाहो फोडण्यापेक्षा लोकसंगीताला नव्याने उर्जितावस्था आणून देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा चंग 'महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान, न्यास'ने बांधला. याच कल्पनेतून जन्म झाला 'लोकरंग' महोत्सवाचा. 29 वर्षांच्या दमदार वाटचालीत या महोत्सवाने कलाप्रांतात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. यंदा 28 ते 30 जून असे तीन दिवस 'लोकरंग महोत्सव 2017'चं आयोजन करण्यात आलं. गिरगावमधल्या साहित्य संघ मंदिर आणि परळच्या दामोदर नाट्यगृहात मराठमोळ्या वातावरणात लोकरंग महोत्सव 2017 रंगला. 'मुंबई लाइव्ह'ने या देखण्या सांस्कृतिक कलाविष्काराच्या माध्यम प्रायोजकत्वाची जबाबदारी स्वीकारली.
प्रेक्षकांनी या कार्यक्रमात पोवाडा, भारुड, गोंधळ या लोकसंगीताबरोबरच डांग, आदिवासी, संहरिया स्वंग, होळी नृत्य, गरासिया नृत्य, ढोल नृत्य, तारपा नृत्य, दशावतार इत्यादी लोकनृत्याचा आस्वाद घेतला. पारंपरिक संगीताला मिळालेली पारंपरिक नृत्याची जोड पाहून प्रेक्षक भारावून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात 'गणपती गजवदना गौरीच्या नंदना' या गीताने झाली. यानंतर खंडेरायाच्या लग्नाला, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वाजले की बारा अशा एकाहून एक गीत आणि नृत्यांच्या बहारदार सादरीकरणातून कलाकारांनी उपस्थित रसिकप्रेक्षकांना महाराष्ट्राच्या कलापरंपरेची सुरेल ओळख करून दिली.
संतोष परब यांच्या लेखणीतून 'लोकरंग'ची संकल्पना साकारली आहे. संतोष आंब्रे यांनी या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन केलं . विशेष म्हणजे हा नृत्य-गीत-संगीताचा हा नजराणा रसिकप्रेक्षकांना विनामूल्य अनुभवता आला.
हे देखील वाचा -
गिरगावकरांनी अनुभवली लोकसंगीताची रंगत!
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)