Advertisement

मुंबई लोकलमध्ये होणार 'कोरोना'बाबत जनजागृती


मुंबई लोकलमध्ये होणार 'कोरोना'बाबत जनजागृती
SHARES

कोरोना व्हायरसला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी जगभरातील डॉक्टर नर्स प्रयत्न करत आहेत. अशातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार व महापालिका ठिकठिकाणी जनजागृती करत आहे. तसंच, कोरोना व अन्य आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच प्लाझ्मादानासाठी कोरोनामुक्तांनी पुढे यावे, यासाठी मुंबई महापालिका रेल्वेची मदत घेणार आहे. कोरोनाविषयक जाहिराती रेल्वे डब्यांमधून केल्या जाणार असून यासाठी मध्य रेल्वेसोबत डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत चार महिन्यांचा करार करण्यात आला आहे.

जाहिरातीपोटी पालिका रेल्वेला ६८ लाख ८६ हजार रुपये देणार आहे. मुंबईत उपनगरी रेल्वेतून सर्वाधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे लोकलद्वारे जनजागृती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लोकलच्या आतील बाजूस खिडकीच्या बाजूच्या पॅनलवर व दरवाजाच्या वरच्या बाजूला या जाहिराती प्रदर्शित करून जनजागृती करण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यांकरीता पालिकेने टेलेक्स ॲडव्हर्टायझिंग यांना जाहिरात प्रदर्शित करण्याचे कंत्राट दिले आहे. याच धर्तीवर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमध्येही जाहिरात प्रदर्शित करून जनजागृती करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोनावर अद्याप पूर्ण नियंत्रण आलेला नाही. मात्र नागरिक कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, तसेच संबंधित नियमांचे पालन करत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क न वापरणारे अनेक जण असतात, तसेच मास्क घातलाच तर तो नाका-तोंडाच्या खाली असतो. त्यामुळे पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

कारवाईसोबतच पालिकेने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माहिती शिक्षण व संपर्क विभागामार्फत मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संदेश जनजागृती करून सातत्याने लोकांपर्यंत पोचवण्यात येतात. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. नागरिकांनी काही नियमांचे पालन केल्यास या आजाराला आळा बसू शकतो. यासाठी लोकलमध्ये जाहिराती करण्यात येणार आहेत. 


गंभीर आजारी रुग्णांकरिता प्लाझ्मादान हा एक उपाय आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तात या आजाराविरुद्ध लढण्याकरिता अँटीबॉडीज तयार झालेली असतात. अशा व्यक्तीने प्लाझ्मादान केल्यास करोना रुग्णांचे प्राण वाचू शकतात. कोरोना आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मादान करावे, याकरिता जनजागृती करणाऱ्या जाहिराती केल्या जाणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा