कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. मागील अनेक महिन्यांपासून सर्वसामान्य सामान्य प्रवासी लोकलचे दरवाजे कधी उघडणार याची वाट पाहत आहे. शिवाय, रेल्वे संघटना व अनेकजण सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार हा प्रश्न गेल्या कित्येक महिन्यांपासून विचारत आहेत. उच्च न्यायालयातही याप्रकरणी सुनावणी सुरू असून, लोकलच्या निर्णयाचं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे सज्ज असल्याचं समजतं. तसंच, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबद्दल इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. मात्र यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहे.
लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे राज्य सरकारला काळजी वाटते आणि त्यामुळे राज्यात पुन्हा रेल्वेगाड्या सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. मध्य रेल्वेने एक किंवा इतर पर्यायांनी गाड्या सुरू केल्या आहेत आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासाची मूभा दिल्यानंतर लवकरच पूर्ण क्षमतेने लोकल धावतील.
राज्य सरकारबरोबर रेल्वेचा चांगला समन्वय आहे. हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी पर्याय स्वीकारण्यात आले आहेत. मुंबईतील लोकल रेल्वेबद्दल बोलायचं झालं, तर आतापर्यंत २० श्रेणीतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वे सज्ज आहे. राज्य सरकारकडून परवानगी येताच लोकल सुरू केल्या जाणार आहेत, असंही मित्तल यांनी म्हटलं.