प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर नेहमी एक घोषणा एेकायला मिळते की, रेल्वे तुमची संपत्ती अाहे. काही प्रवाशांनी ही घोषणा खूपच गंभीरपणे घेतल्याचं दिसून येत अाहे. कारण रेल्वे प्रवासात मिळणारं सामान अापलीच संपत्ती असल्याचं समजून हे प्रवाशी ते सामान घेऊन जात अाहेत. या अशा चोरट्या प्रवाशांमुळे रेल्वेला मागील ३ वर्षांमध्ये तब्बल ४ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं अाहे. पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या अाकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर अाली अाहे.
पश्चिम रेल्वेच्या अाकडेवारीनुसार, मागील अार्थिक वर्षात १.९५ लाख टाॅवेल्स लांब पल्ल्यांच्या ट्रेनमधून चोरल्या गेल्या अाहेत. एवढंच नाही तर ८१,७३६ चादरी, ५५,५७३ उशांचे कव्हर, ५०३८ उशा अाणि ७०४३ ब्लँकेट्स प्रवाशांनी चोरून नेले अाहेत. याशिवाय टाॅयलेटमधील २२० मग, १ हजार नळ अाणि ३०० पेक्षा अधिक प्लश पाईपवरही या चोरट्या प्रवाशांनी डल्ला मारला अाहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं की, एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ७९,३५० टाॅवेल्स, २७,५४५ चादरी, २१,०५० उशांचे कव्हर, २१५० अशा अाणि २०६५ ब्लँकेट्स ट्रेनमधून चोरीला गेल्या अाहेत. या सर्व वस्तूंची किंमत जवळपास ६२ लाख रुपये अाहे. मागील सोमवारी मुंबईत बांद्रा येथून ट्रेनमध्ये चढणाऱ्या रतलाम येथील व्यक्तीला ३ ब्लँकेट, ६ चादरी अाणि ३ उशा चोरल्याप्रकरणी अटक केली अाहे.
मागील ३ अार्थिक वर्षांमध्ये भारतीय रेल्वेला ४ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं अाहे. यामधील सर्वाधिक नुकसान हे चोरट्या प्रवाशांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वस्तू चोरून नेल्या जात असल्याने झालं अाहे. सर्व प्रवाशी वस्तू परत देतात की नाही हे पाहण्याचं काम कोच अटेंडेंटचं असतं. त्यामुळे चादर अाणि इतर वस्तूंच्या चोरीची नुकसान भरपाई कोच अटेंडेंटला भरावी लागते. तर बाथरूमच्या सामानाची भरपाई रेल्वे करते.
हेही वाचा -
पनवेल-पेण रेल्वे सेवा लवकरच सुरू
रिक्षा-टॅक्सीपाठोपाठ अाता एसटीलाही हवीय भाडेवाढ