महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून एसटी प्रशासनाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या २ ते ३ दिवसांत १० हजार बसद्वारे अडकलेल्या लोकांना मोफत घरी सोडण्यात येईल.
याबाबतचं नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनाची माहिती, प्रवाशांना तपासण्याचं काम, आवश्यकता पडल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणाचं काम याबाबत सविस्तर चर्चा विभागाकडून करण्यात आली असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
हेही वाचा - मुंबई, पुण्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक
मोफत प्रवासासाठी निधी
राज्यातील मुंबई, पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेले लोकं या सर्वांनाच पुढील ४ ते ५ दिवसात त्यांच्या स्वजिल्हयात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लक्ष घालून विषय मार्गी लावण्यासाठी सहकार्य केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. प्रवाशांना कुठल्याही प्रकारे तिकीटांचा भुर्दंड पडणार नाही, अशा उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला केल्या होत्या. यानुसार एसटी महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
होईल सुरक्षित प्रवास
राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. ही कोरोना लढाई जिंकण्यासाठी राज्यात प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्य करत असून आपण ही लढाई लवकरच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशासन व शासनाच्या चांगल्या योगदानामुळे राज्यात कोरोना मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. इतर देशांच्या तुलनेत राज्य शासन कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यातही यशस्वी झालं आहे. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन जनतेकडून झाल्याने आपण ही आकडेवारी कमी ठेवण्यात यशस्वी झालो. राज्य शासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करून तसंच आवश्यक उपाययोजना करून आपण ही कोरोना लढाई निश्चितच जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यातून आपला देश, आपलं राज्य व गाव वाचवू असं ते म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला घरी राहा सुरक्षित राहा असा संदेशही यावेळी दिला.
हेही वाचा - कोरोनामुळे झोपडपट्ट्यांमधील मृत्यूचं प्रमाण ६० टक्के