रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे मार्गाचं विस्तारीकरण केलं जात आहे. त्यानुसार, हार्बर मार्गावरील पनवेल स्थानक ते मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत स्थानक अशी लोकलसेवा सुरू करण्यात येणार आहे. परंतु, या मार्गाच्या कामाला अद्याप गती मिळाली नसून, हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी ४ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. एमयूटीपी-३ अंतर्गत असलेल्या पनवेल ते कर्जत नवीन दुहेरी मार्गाचं प्रत्यक्षात काम एका महिन्यानंतर सुरू होणार आहे. मात्र, या मार्गावरील कामे पूर्ण करेपर्यंत २०२४ साल उजाडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पनवेल ते कर्जत सध्या एकच मार्गिका असून, लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलनं जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. मात्र त्यात बराच वेळ जातो. त्यामुळं पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना मिळू शकतो.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांचा खर्च १० हजार ९४७ कोटी रुपये असून यातील २ हजार ७८३ कोटी रुपये पनवेल ते कर्जत दुहेरी मार्गासाठी खर्च होणार आहे. एमयूटीपी-३ ला डिसेंबर २०१६ ला मंजुरी मिळाली, परंतु यातील कळवा ते ऐरोली उन्नत मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरणासह पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग इत्यादी प्रकल्प निधी, निविदा व भूसंपादनातील अडचणींमुळे पुढेच सरकू शकलेच नाहीत.
पनवेल ते कर्जत उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्प राबवण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काढलेल्या निविदांना मे २०१९ मध्ये मंजुरी मिळाली. आता त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर काही सर्वेक्षण व अन्य कामे बाकी आहेत. एका महिन्यात ती पूर्ण करून त्यानंतर प्रत्यक्षात या मार्गिकेचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनामुळेही मध्यंतरी प्रकल्पाचे काम थांबले होते, परंतु आता ते सुरू करण्यात आले. दुहेरी उपनगरी मार्ग तयार करण्यासाठी ४ वर्षे लागणार आहेत. यात सध्याच्या पनवेल येथील मार्गिकेवरूनच उन्नत मार्गिका उभारण्यात येईल व काही अंतर संपताच ही नवी मार्गिका उतरेल. त्यासाठी छोटा उन्नत पूलही उभारला जाईल. अशाच प्रकारचे काम कर्जत स्थानकातही केले जाणार आहे.
या मार्गावरील स्थानकं
या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेल ते कर्जतदरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. प्रकल्पात पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. दुहेरी मार्ग साधारण २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते, मात्र आता त्याला आणखी विलंब होणार आहे.