दिवसेंदिवस रेल्वेचे वाढलेले अपघात पाहता मुंबईची लाईफलाईन प्रवाशांसाठी जीवघेणी ठरतेय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या रविवारी तर एकाच दिवसात तिन्ही मार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये तब्बल 16 प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर बुधवारी 15 आणि गुरुवारीही 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना फोल ठरत असून, अचानक मृत्यूंच्या संख्येत होणारी ही वाढ रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येतंय.
आकडेवारीनुसार मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर दरदिवशी सरासरी दहा प्रवाशांचा मृत्यू होतो. तर जखमींची संख्या त्यापेक्षा जास्त असते. मात्र अलिकडे एकाच दिवसात हीच आकडेवारी पंधराच्या पुढे जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दोन आठवड्यापूर्वी शनिवारी एकाच दिवसात 15 प्रवाशांचा बळी गेला होता. मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर रोजच्या प्रवासात रेल्वे रुळ ओलांडणे, चालती लोकल पकडणे, लोकलच्या दारात उभे राहणे यामुळे विविध अपघातांना आमंत्रण मिळते. तर मागील 17 दिवसांमध्ये तब्बल 165 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
बुधवारी झालेले अपघात -
रेल्वे स्थानक | संख्या |
कुर्ला | 3 |
डोंबिवली | 3 |
कल्याण | 2 |
वडाळा रोड | 1 |
वाशी | 1 |
पनवेल | 1 |
वांद्रे | 1 |
अंधेरी | 2 |
बोरीवली | 1 |
एकूण | 15 |
गुरुवारी झालेले अपघात -
रेल्वे स्थानक | संख्या |
सीएसटी | 1 |
दादर | 1 |
कुर्ला | 1 |
ठाणे | 1 |
डोंबिवली | 1 |
कल्याण | 2 |
वडाळा रोड | 1 |
चर्चगेट | 1 |
वांद्रे | 1 |
अंधेरी | 1 |
बोरीवली | 1 |
एकूण | 12 |