माथेरानमध्ये पर्यटनासाठी गेल्यावर बऱ्याच जणांना मिनी ट्रेननं प्रवास करण्याचा मोह होतो. अशा पर्यटकांसाठी ही खूशखबर आहे. नेरळ-माथेरान या मिनी ट्रेनला आता व्हिस्टाडोम (पारदर्शक) डबा जोडण्यात येणार आहे. या डब्याच्या बाहेरील बाजूस निसर्गचित्रं लावण्यात आली आहेत, जी पर्यटकांना आकर्षित करतील.
माथेरानच्या मिनी ट्रेनला व्हिस्टाडोम (पारदर्शक) डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं मागील वर्षीच घेतला होता. नव्या वर्षात हा निर्णय अंमलात येणार होता. त्यानुसार, येत्या २३ फेब्रुवारीला मिनी ट्रेनला व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे. या डब्यात बऱ्याच अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. त्यामुळं पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचं म्हटलं जातं आहे. तसंच, पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता यावा आणि सभोवतालचं निसर्ग सौंदर्य अनुभवता यावं, यासाठी हा विशेष व्हिस्टाडोम डबा तयार करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या कुर्डूवाडी येथील कारखान्यात या डब्याची निर्मिती करण्यात आली आहे.
या व्हिस्टाडोम डब्यामध्ये एकूण ४० आसनांची व्यवस्था आहे. काचेच्या मोठ्या खिडक्या, पारदर्शक छत, आकर्षक रंग, अंतर्गत सजावट, आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, रंगबेरंगी एलईडी दिवे, एलईडी टिव्ही स्क्रीन, नक्षीदार लाकडी फर्निचर अशा अनेक सुविधांचा या डब्यात समावेश करण्यात आला आहे. ही बातमी वाचल्यावर मिनी ट्रेनच्या पारदर्शक डब्यातून प्रवास करण्याचे वेध पर्यटकांना लागतील यात शंका नाही.
हेही वाचा -
EXCLUSIVE : नायक नहीं 'खलनायक' हूं मैं : मंगेश देसाई
इतिहासजमा ट्राम लवकरचं मुंबईकरांच्या भेटीला