महिला प्रवाशांसोबत होणारी छेडछाड, चोरी, लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने लेडिजच्या डब्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान (एमएससी) आणि महिला होमगार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने गुरूवारी यासंबंधीची माहिती दिली.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने आतापर्यंत आरपीएफचे ९८० जवान या कामासाठी नेमले होते. त्यात आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान आणि होमगार्डलाही या कामात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे २३२ जवान आणि ९७ महिला होमगार्ड यापुढे महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात राहतील.
सकाळी आणि संध्याकाळी पश्चिम रेल्वेवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात असते. जे पादचारी पूल, प्लॅटफॉर्म, गजबलेली आणि गर्दीची स्टेशन आहेत, त्या ठिकाणी हे जवान कार्यरत असतील. महिलांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ आणि 'एमएससी' एकत्र मिळून काम करणार आहेत. या जवानांना त्यासाठी दोन दिवसांचं खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
महिलांच्या डब्यात चढण्यासाठी, रांगेला आणि गर्दीला नियंत्रित करण्यासाठी अंधेरी स्थानकात महिला होमगार्ड असणार आहेत. या महिला होमगार्ड आरपीएफच्या 'तत्काळ प्रतिसाद' या टीमसोबत काम करणार आहेत. त्यानंतर बोरीवली, वांद्रे आणि भाईंदर या स्थानकांतही या महिला होमगार्डची नेमणूक करण्यात येणार आहे. शिवाय, या महिला होमगार्ड प्लॅटफॉर्म आणि गर्दीच्या ठिकाणीही कार्यरत असणार आहे.
हे जवान पश्चिम रेल्वेवरील ३४ पादचारी पूलांच्या एन्ट्री आणि एक्झिटच्या ठिकाणी असणार आहेत.
हेही वाचा-
थर्टी फर्स्टला उगाच 'लफडा' नको, शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त