पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक ओम राऊतच्या सिनेमात सुभेदार तानाजी मालुसरेंची भूमिका साकारणारा अजय देवगण प्रेक्षकांना चाणक्य यांच्या रूपातही दर्शन देणार आहे.
बऱ्याच वर्षांपासून ‘चाणक्य’ हा सिनेमा बनवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. हे माझं पॅशन आहे. अजयने साकारलेल्या जिनिअस धोरणी व्यक्तिमत्त्वाचं चित्रणही प्रेक्षकांना निश्चितच आवडेल
नीरज पांडे, दिग्दर्शक
चाणक्य साकारण्यासाठी खूप उत्सुक असून, नीरज पांडे यांचं काम अतिशय जवळून आणि बारकाईने पाहिल्याचं अजयचं म्हणणं आहे. नीरज अतिशय सुस्पष्टपणे आणि पॅशनेटली ही गाथा सांगतील याची खात्रीही अजयला वाटते.
चाणक्य या व्यक्तिमत्त्वाने आपल्याला नेहमीच भारून टाकलं असून, त्यांच्या राजकीय क्रांतीनं भारतीय प्राचीन इतिहासाचा गतिमार्ग बदलून टाकल्याचं मत प्लॅन सीच्या शीतल भाटिया यांनी व्यक्त केलं.
चाणक्यसारख्या व्यक्तिमत्त्वाभोवती कायम गूढ वलय आणि एक अस्तित्व राहिलं आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांकडून नक्की स्वीकारला जाईल, याची खात्री असल्याचं रिलायन्स एंटरटेन्मेंटचे शिबाशिष सरकार यांचं म्हणणं आहे.
भारतीय इतिहासातील राजकीय विचारवंत, तत्त्ववेत्ते, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय सल्लागार अशी ख्याती असणाऱ्या चाणक्य यांच्यावर आधारित असलेल्या सिनेमाची घोषणा अनिल डी. अंबानी यांच्या रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि फ्रायडे फिल्मवर्क्स कंपनीच्या प्लॅन सी स्टुडिओतर्फे करण्यात आली आहे.
अजय देवगण शीर्षक भूमिकेत
भव्य नाट्य असलेल्या या चित्रपटात अजय देवगण शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक अशी चौफेर कामगिरी करणारे नीरज पांडे करणार आहेत. ख्रिस्तपूर्व काळात चौथ्या शतकात चाणक्य हा महान योद्धा होऊन गेला, परंतु एक शिक्षक, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय सल्लागार म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली. चंद्रगुप्त मौर्य यांची कारकिर्द घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.