पुलवामामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण देशभर मोर्चे आणि नारेबाजी करण्यात आली. आजवर केवळ सोशल मीडियावर निषेध व्यक्त करणाऱ्या बॅालिवूडनेही यात सहभागी होत ब्लॅक संडेचा नारा दिला आहे. याअंतर्गत गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमध्ये काम बंद ठेवण्यात येणार आहे.
आज संपूर्ण देशभर मोर्चे काढत अतिरेक्यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. अतिरेक्यांचा हा भ्याड हल्ला जिव्हारी लागलेल्या नागरिकांनी केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर लहान-सहान खेड्यांमध्येही अघोषित बंद पाळला. सर्वसामान्य नागरिकांनीही स्वत:हून या बंदमध्ये सहभागी होऊन केवळ आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत, तर शहिदांना आदरांजलीही वाहिली. यात सिनेसृष्टीही मागे नाही. फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॅाईजच्या (एफडब्ल्यूआयसी)वतीने रविवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी ब्लॅक डे घोषित करण्यात आला आहे.
एफडब्ल्यूआयसीने प्रकाशित केलेल्या पत्रकामध्ये 'कोई शूटिंग, सेटींग, पोस्ट प्रॅाडक्शन नही होगा!' असं थेट म्हणत शहिदांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काश्मीरमधील पुलवामामध्ये करण्यात आलेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सीआरपीएफच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशहितार्थ बंद करण्यात येत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
एफडब्ल्यूआयसीने या पत्रकाच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील सर्व निर्माते, कलाकार, मजूर आणि तंत्रज्ञांना आवाहन केलं आहे. रविवारी दुपारी १२ वाजता गोरेगाव येथील फिल्मसिटीच्या गेटवर सर्वांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत सिनेसृष्टीचं कामकाज पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. एफडब्ल्यूआयसीचे अध्यक्ष बी. एन. तिवारी आणि जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी संपूर्ण फेडरेशनच्या वतीने ही बंदची हाक दिली आहे.