कथा आणि त्यावर रचलेली पटकथा हा सिनेमाचा मूळ पाया असतो. हा पायाच जर भरीव नसेल तर त्यावर उभारलेला सिनेमाचा डोलारा केवळ खेळातील पत्त्यांसारखा असतो, जो केवळ दिसायलाच सुंदर असतो. या सिनेमाच्या बाबतीतही असंच घडलं आहे. विषय चांगला आणि अनेकांच्या आपुलकीचा असला तरी ढिसाळ पटकथेने घात केला आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाचा सहाय्यक म्हणून काम केलेल्या अतुल मांजरेकर या तरुण दिग्दर्शकाने या सिनेमाचं दिग्दर्शन केल्याने तसंच अनिल कपूर, ऐश्वर्या राय यांसारख्या दिग्गज कलाकारांमुळे या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. हा सिनेमा मात्र त्यांची पूर्तता करण्यात अपयशी ठरला आहे. यासाठी सिनेमाची पटकथा जबाबदार आहेच, पण त्यासोबतच दिग्दर्शकही आहेच.
फन्ने खान म्हणजे ज्याच्या अंगी कलागुण आहेत, पण ते सादर करण्याची संधी किंवा उचित व्यासपीठ न मिळाल्याने मागे राहिलेला कलाकार. या सिनेमाची कथा गल्लीबोळात राहणाऱ्या प्रत्येक फन्ने खानचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रशांत शर्माची (अनिल कपूर) आहे. तरुण असताना आॅर्केस्ट्रामध्ये गाणाऱ्या प्रशांतला सर्व फन्ने खानच म्हणतात. मुलगी लतालाही (पिहू संद) बेबी सिंगसारखी (ऐश्वर्या राय-बच्चन) फार मोठी स्टार बनवायचं हे प्रशांतचं स्वप्न आहे.
पत्नी कविताला (दिव्या दत्ता) प्रशांतच्या भावना जशा समजत असतात तशीच लताच्या मर्यादांची कल्पना असते. शरीराने स्थूल असल्याने सर्वजण लताची टर उडवत असतात. प्रत्येक वेळी मिळणारं अपयश आणि लोकांनी केलेली चेष्टा याचा राग लता आपल्या वडीलांवर काढत असते. इकडे प्रशांतची फॅक्ट्री बंद होते. या फॅक्ट्रीत प्रशांतचा एक जीवलग मित्र आहे अधिर (राजकुमार राव). फॅक्ट्री बंद झाल्याने प्रशांत टॅक्सी चालवत असतो. एक दिवस बेबी आपल्या मॅनेजर करण कक्कडवर (गिरीश कुलकर्णी) रागावून गाडीतून उतरते आणि प्रशांतच्या टॅक्सीत बसते. इथेच प्रशांतला एक कल्पना सुचते आणि कथानक नाट्यमय वळण घेतं.
आपणही गायन, अभिनय करू शकतो असं वाटणाऱ्या प्रत्येकाची ही कथा आहे. असं असलं तरी ती सिनेमाच्या रूपात सादर करताना पटकथेची अचूक बांधणी झालेली नाही. लताला गायिका व्हायचंय, पण ती कधीच रियाज करताना दिसत नाही. थेट स्टेजवर किंवा चाळीच्या पटांगणात गाणं गाते. बेबी सिंग गायब झाल्यानंतर त्याची कुठेही फारशी चर्चा होत नाही. किडनॅपर पैसे मागत नाही हे ऐकून बेबीच्या मॅनेजरला प्रश्न पडत नाहीत. तिला सोडवण्यासाठी हालचाली करण्याऐवजी तो किडनॅपरच्या सांगण्यावरून थेट गाण्याचा अल्बम बनवू लागतो. हे सगळं खूपच सामान्य पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. यात कुठेही राकेश ओमप्रकाश मेहरांच्या शैलीचा हलकासाही स्पर्शही जाणवत नाही.
एका वडीलांनी आपल्या मुलीसाठी पाहिलेलं स्वप्न आणि ते साकार करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड या सिनेमात आहे. त्यासाठी काय चूक आणि काय बरोबर हे त्यांना ठाऊक नसतं. किंबहुना त्याचा विचारही त्यांना करायचा नसतो. केवळ आपल्या मुलीला स्टार बनवायचा हा एकच ध्यास त्याला लागलेला असतो. अशा परिस्थितीत ते कोणती पावलं उचलतात ते पाहताना पाहणाऱ्याच्या मनाचीही घालमेल होणं गरजेचं होतं, पण या सिनेमाच्या बाबतीत तसं काहीही घडत नाही. सिनेमाचा क्लायमॅक्स खूपच बालीशपणे चित्रीत करण्यात आला आहे.
‘बदन पे सितारे...’ हे सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या गाण्यात २० वर्षांपूर्वीच्याच अनिल कपूरना पाहातोय की काय असा भास होतो. गाणं छान आहेच, पण अनिलने त्यावर सुरेख परफॅार्म केलं आहे. सुनिधी चौहानच्या आवाजातील ऐश्वर्यावर चित्रीत केलेलं ‘मोहब्बत...’, मोनाली ठाकूरच्या आवाजातील ‘तेरे जैसा तू है...’ आणि ‘अच्छे दिन...’ ही गाणीही चांगली आहेत. कलादिग्दर्शन, पार्श्वसंगीत, छायालेखन या बाजूही ठीक आहेत.
अनिल कपूरने पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. फन्ने खानची व्यक्तिरेखा साक्षात जगताना अनिलने त्यातील प्रत्येक पैलू बारकाईने सादर केला आहे. पहिल्या गाण्यातील अनिल आणि नंतर संपूर्ण सिनेमात वावरणारा पिता यातही खूप फरक दाखवला आहे. या मागोमाग गिरीश कुलकर्णीचं कौतुक करावं लागेल. गिरीशला हिंदी सिनेमात प्रथमच इतक्या मोठ्या लांबीची व्यक्तिरेखा मिळाली आहे. ती त्याने सुरेखरीत्या सादर केली आहे.
राजकुमार राव आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण या दोन्ही व्यक्तिरेखा अनिलने साकारलेल्या फन्ने खानसमोर झाकोळल्या गेल्या आहेत. ऐश्वर्याचं सुंदर दिसणं आणि सुरेख नृत्य या सिनेमाला ग्लॅमरस टच देणारं आहे. पिहूनेही लताची भूमिका साकारताना दोन पिढ्यांमधील बदललेली विचारसरणी आणि यश न मिळाल्याने होणारी घुसमट चांगल्या प्रकारे सादर केली आहे. दिव्या दत्तानेही चांगलं काम केलं आहे.
थोडक्यात काय तर ‘फन्ने खान’ हा सिनेमाची अवस्था माणसात दडलेल्या फनकारासारखीच झाली आहे. कलागुण अंगी असूनही हा सिनेमाही गल्लीबोळातील असंख्य फन्ने खानांसारखाच बनला आहे.
दर्जा : **
............................
चित्रपट: फन्ने खान
दिग्दर्शक: अतुल मांजरेकर
पटकथा: अतुल मांजरेकर, हुसैन दलाल, अब्बास दलाल
कलाकार: अनिल कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, राजकुमार राव, गिरीश कुलकर्णी, दिव्या दत्ता, पिहू संद, सतिश कौशिक
हेही वाचा-
‘इन निक ऑफ टाइम’मुळे प्रियंका चोप्रा बनली टॉप ट्रेंडिंग अॅक्ट्रेस