हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेते कादर खान यांचं कॅनडात दीर्घ आजाराने निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कादर खान यांच्या निधनाची बातमी आल्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
कादर खान यांनी आपल्या सिने कारकिर्दीत असंख्य संवेदनशील भूमिका साकारल्या, खलनायकही रंगवले, परंतु नवी पिढी त्यांना ओळखते ती काॅमेडी कलाकार म्हणून. कादर खान काॅमेडीकडे का वळले? यामागेही एक रंजक कहानी आहे.
सुरूवातीला लहान-मोठ्या भूमिका साकारल्यानंतर कादर खान सिनेमांत मुख्य व्हिलन साकारु लागले. ते मोठ्या पडद्यावर खलनायक इतक्या ताकदीने साकारायचे की जनमाणसांतही त्यांची ओळख नकारात्मक झाली होती. एक दिवस त्यांचा मुलगा फाटलेला शर्ट घरी घेऊन आला. त्यावेळेस त्याला विचारल्यावर मित्रासोबत भांडण झाल्याचं त्याने सांगितलं. परंतु भांडणाचं कारण विचारल्यावर मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
तुझे वडील सिनेमात आधी हिरोला मारतात, पण शेवटी खूप मार खातात. असं सगळेच मित्र आपल्याला चिडवत असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं. तेव्हा कादर खान यांनी व्हिलनच्या भूमिकेतून बाहेर पडण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला.
त्याचवेळेस त्यांच्याकडे 'हिंमतवाला' सिनेमाची कथा लिहिण्याची जबाबदारी आली होती. तेव्हा कादर खान यांनी अत्यंत हुशारीने आपल्यासाठी या सिनेमात विनोदी भूमिका रचली.
ही भूमिका प्रेक्षकांनी इतकी डोक्यावर घेतली या सिनेमाच्या पोस्टरवर जितेंद्र आणि श्रीदेवीसोबत कादर खान यांचाही फोटो लावावा लागला. तिथून खऱ्या अर्थाने कादर खान यांच्या विनोदी भूमिकांचा प्रवास सुरु झाला.
हेही वाचा-
दुर्दैवी, अफवा खरी ठरली! ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं कॅनडात निधन
ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची 'अफवाच'