Advertisement

सोनू सूदच्या अवैध बांधकामप्रकरणी हायकोर्टानं निकाल राखून ठेवला

अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील शक्ती सागर या सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सोनू सूदविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सोनू सूदच्या अवैध बांधकामप्रकरणी हायकोर्टानं निकाल राखून ठेवला
SHARES

मुंबई महापालिकेने  अनधिकृत बांधकामप्रकरणी अभिनेता सोनू सूद विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने  प्रकरणावर आपला निर्णय राखून ठेवला. यापूर्वी ११ जानेवारी रोजी कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती.

अभिनेता सोनू सूद याच्या जुहू येथील शक्ती सागर या सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सोनू सूदविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोनू सूद याने मुंबई महापालिकेविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली.  

मुंबई महापालिकेने मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा सवयीचा गुन्हेगार आहे. सोनू सूदविरोधात अवैध बांधकामाच्या आरोपांखाली महापालिकेनं नोटीस पाठवली असून जुहू येथील रहिवासी इमारतीत महापालिकेला कुठलीही माहिती न देता त्याने संरचनात्मक बदल केले असल्याचा आरोप या नोटीसीत करण्यात आला आहे. 

पालिकेच्या सर्व आरोपांचे सोनू सूदने खंडन केले आहे. इमारतीमधील बदलासाठी आपण पालिकेकडून यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजूरी मिळणे बाकी आहे. त्यामुळे सध्या मी कामही थांबवले आहे, असे सोनू सूदने म्हटले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना कायद्यांतर्गत इमारतीत अनियमित बदल केले आणि जागेचा वापर बदलून निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. यावरून पालिकेची आवश्यक परवानगी घेतली नाही, असे तपासणीत आढळले होते. त्यानंतर पालिकेने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सोनूला एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली होती. त्याविरोधात सोनूने दिवाणी न्यायालयात कठोर कारवाई होऊ नये म्हणून तातडीचा अर्जही केला होता. मात्र, दिवाणी न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावतानाच त्याविरोधात अपील करण्यासाठी त्याला तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याचा अर्ज फेटाळला जाताच पालिकेने जुहू पोलिसांत चार जानेवारीला लेखी तक्रार दिली.



हेही वाचा -

सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस

दिलासादायक! मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा