'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' या सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या झोया अख्तरचा 'गली बॉय' हा सिनेमा एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवणारा आहे. मागील काही वर्षांपासून रॅप सिंगींगची कला जागतिक पातळीवर तळागाळातील तरुणाईपर्यंत पोहोचलेली आहे. इंग्रजी रॅपिंगसोबतच आता प्रादेशिक भाषेत रॅप करणाऱ्या कलाकारांची संख्याही वाढली आहे. रॅपिंगचं हे विश्व आजवर हिंदी सिनेमात कोणीही मांडलेलं नाही. हेच काम करताना झोयानं एका अशा तरुणाची कथा जगासमोर आणली आहे जी केवळ प्रेरणादायीच नाही, तर स्वप्न पाहून ती साकार करण्याची जिद्द अंगी बाणवणारी आहे.
या सिनेमाची कथा डिव्हाईन आणि नेझी या स्ट्रीट रॅपर्सच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. या सिनेमात दिग्दर्शिकेच्या रूपातील एक वेगळीच झोया दिसते. यापूर्वी सिनेमांमध्ये उच्चभ्रू वस्तीतील कथा मांडणारी झोया या सिनेमासाठी थेट धारावीत उतरली. रणवीर सिंग आणि आलिया भट या दोन मुख्य व्यक्तिरेखांच्या बळावर तिने एक असा म्युझिकल ड्रामा बनवला आहे, जो तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना पाहायला आवडेल. रीमा कातगीसोबत झोयानं लिहिलेली पटकथा या सिनेमाचा आत्मा आहे.
ड्रायव्हरचं काम करणाऱ्या आफताब शेख (विजय राज) यांचा मुलगा मुरादची (रणवीर सिंग) ही कथा आहे. धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुरादच्या घरी आई (अमृता सुभाष), आजी (ज्योती सुभाष) आणि भाऊ चिंटू (राहुल) असा परिवार आहे. घरची परिस्थिती हालाखीची असूनही त्याचे वडील दुसरं लग्न करतात. कॅालेजमध्ये शिकणाऱ्या मुरादला गाणी लिहिण्याचं वेड असतं. गल्लीतील मित्रांच्या जोडीला प्रेयेसी सफीनाही (आलिया भट) त्याला साथ देत असते. एक दिवस त्यांच्या कॅालेजमध्ये रॅपर एम.सी. शेरचा (सिद्धांत चतुर्वेदी) ग्रुप परफॅार्म करायला येतो. मुरादला त्यांचं रॅपिंग खूप भावतं. त्यानंतर तो एम.सी.ला फेसबुकवर शोधून गाठतो. इथेच मुरादची एका वेगळ्या विश्वात एंट्री होते. हे विश्व असतं रॅप साँगचं. इथेच त्याला 'गली बॉय' हे नावही मिळतं. मित्रांच्या साथीने तो रॅप साँग परफॅार्म करायलाही शिकतो आणि स्पर्धांमध्ये उतरून स्वत:ला सिद्धही करतो. सोशल मीडियावर 'गली बॉय'चा धमाका होतो आणि तो मग रॅप बॅटलमध्ये सहभागी होत विजयश्री खेचून आणतो.
पटकथेची मांडणी अतिशय साध्या पद्धतीने केली जाणं ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. अतिरंजक स्वप्न, आकांक्षा आणि ड्रामेबाजीच्या फंदात न पडता एखाद्या झोपडपट्टीमध्ये कशा प्रकारचं वातावरण असू शकतं त्याचं सुरेख चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. 'कोई बडी मुराद अगर सपने में दिख जाए, तो ट्राय करने का ना?', 'ये सिक्का भी एक दिन कमाल दिखाएगा', 'अपना टाइम आएगा...' या संवादांच्या जोडीला 'नौकर का बेटा नौकर बनेगा ये फितरत' हा संवाद मुरादला प्रवाहाविरोधात पोहण्याची शक्ती देण्यासाठी पूरक ठरतो. याचं श्रेय संवादलेखक-अभिनेते विजय मौर्या यांना जातं.
विशेष म्हणजे या सिनेमातील नायक केवळ चांगलंच काम करत नाही, तर गरजेसाठी चोऱ्याही करतो आणि वेळप्रसंगी प्रेयेसीचा विश्वासघातही करतो. इथेच या सिनेमाच्या कथेतील खरेपणा भावतो. केवळ गोड-गोड न दाखवता एखाद्या गलिच्छ वस्तीत राहणारा तरुण काय करू शकतो हे प्रामाणिकपणे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. असं असलं तरी या सिनेमात गरीबीचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं नाही. त्यामुळेच इथली गरीबी आणि झोपडपट्टीही सिनेमातील एक व्यक्तिरेखाच वाटू लागते.
नायकाच्या जीवनातील चढ-उतार मांडताना तो कुठेही व्हॅायलंट होणार नाही याची काळजीही घेण्यात आली आहे. नायक वडीलांना धक्का देतो तो केवळ आपल्या आईचा बचाव करण्यासाठी. त्यांच्यावर हात उचलत नाही. वडीलांच्या जागेवर बदली ड्रायव्हर म्हणून काम करताना मालकाच्या मुलीच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी पबमध्ये जाऊन तोडफोडही करीत नाही. यांसारख्या बऱ्याच घटना रणवीरने यापूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि मुरादमधील फरक अधोरेखित करतात. 'मेरे बॅायफ्रेंड से गुलूगुलू करेगी, तो धोपटूंगीही ना उसको...' यांसारख्या डायलॅागच्या जोडीला सफीनाचा गेटअप आणि आलिया भटचा वास्तववादी अभिनय तिला एखाद्या झोपडपट्टी टाईप मुलीच्या रूपात सादर करण्यात यशस्वी ठरला आहे. सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंतच्या कथानकात बरेच उतार-चढाव असून कथानक वेगात पुढे सरकतं. मध्यंतरानंतर मात्र थोडा वेळ काढत पुढे सरकतं. त्यात मुरादचा स्ट्रगल असल्याने कदाचित असं घडलं असण्याची शक्यता आहे.
या सिनेमाच्या यशात लेखक-दिग्दर्शक-कलाकारांचा जितका मोलाचा वाटा आहे, तितकाच तंत्रज्ञांचाही आहे. संगीतकार शंकर-एहसान-लॅाय यांचं संगीतही या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावतं. बोस्को आणि सीझर या कोरिओग्राफर दुकलीने केलेली कोरिओग्राफी रणवीरसह त्याच्या संपूर्ण ग्रुपला खऱ्याखुऱ्या रॅपर्सच्या रूपात सादर करणारी आहे. इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमात चार टिपीकल स्टाईलची गाणी नाहीत. यात केवळ आणि केवळ रॅप साँग्जच आहेत. सिनेमॅटोग्राफर जय ओझा यांची सिनेमॅटोग्राफीही लक्ष वेधून घेणारी आहे. बाहेरून कारवर पडणाऱ्या असंख्य छोट्या लाईट्सचं प्रतिबिंब टिपणारा सीन, दरवाजा बंद होताना त्यावर दिसणाऱ्या रणवीरच्या दोन प्रतिमांचं दरवाजा बंद झाल्यावर एकत्र येणं... यांसारख्या बऱ्याच लहानसहान दृश्यांमधून त्यांनी आपली कलाकारी दाखवली आहे.
रणवीर सिंग हे एक आकलनापलीकडलं रसायन असल्याचं हा सिनेमा पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं. मसालेदार 'सिंबा'ची जादू ओसरली नसताना या सिनेमात त्याने साकारलेला संयमी, सहनशील, विचारी मुराद मनाला भावतो. लुकपासून स्टाईलपर्यंत प्रत्येक बाबतीत आपण मुरादच दिसायला हवं यासाठी त्याने केलेला अट्टाहासही जाणवतो आणि रॅपिंगसाठी घेतलेली मेहनतही.... या जोडीला आलिया भटसोबतची त्याची केमिस्ट्रीही वर्क करते. आलियानेही पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय करत आपल्यामधील अभिनयकौशल्याचं दर्शन घडवलं आहे. कोणतंही कॅरेक्टर द्या, आम्ही ते त्या प्रकारे साकारू हेच जणू या दोघांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. यांच्या जोडीला सिद्धांत चतुर्वेदीनेही अप्रतिम काम केलं आहे. रणवीरच्या आईच्या भूमिकेत अमृता सुभाषने कमालीचा अभिनय केला आहे. वास्तवात अमृताची आई असणाऱ्या ज्योती सुभाष यांनीही आजीची छोटीशी भूमिका छान रंगवली आहे. विजय राजने साकारलेले सणकी, संपातलेले वडीलही लक्षात राहतात. यासोबतच कल्की कोचलीन, विजय वर्मा, शिबा चढ्ढा, नकुल सहदेव, श्रुती चौहान आदी कलाकारांची कामंही चांगली झाली आहेत.
फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेत आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहात ते साकार करण्याची जिद्द असणाऱ्या मुरादची कथा प्रेरणादायी ठरणारी आहे. हालाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या अनेकांना आपल्या मनातील 'मुराद' पूर्ण करण्याचं बळ देणारा हा सिनेमा प्रत्येकाने पाहायला हवा.
दर्जा : ****
...........................................................................
निर्माते : रितेश सिधवानी, झोया अख्तर, फरहान अख्तर
दिग्दर्शक : झोया अख्तर
कलाकार : रणवीर सिंग, आलिया भट्ट, कल्की कोचलीन, सिद्धांत चतुर्वेदी, अमृता सुभाष, विजय राज, विजय वर्मा, शिबा चढ्ढा, नकुल सहदेव, श्रुती चौहान
हेही वाचा -
‘व्हॅलेंटाइन डे’ला अवतरली आदितीची ‘राधा’
‘लोकल-व्हाया-दादर’च्या प्रेमात वरुण!