संपलेलं २०१८ हे वर्ष सिनेसृष्टी आणि रसिकांना काय देऊन गेलं? असं कुणी विचारलं तर त्याचं उत्तर 'बायोपिक'चा ट्रेंड असं देता येईल. कारण २०१८ मध्ये बरेच 'बायोपिक' म्हणजेच चरित्रपट आले आणि गाजलेही. २०१९ हे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही. कारण गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 'बायोपिक'चं पीक जोमात आल्याचं पाहायला मिळणार आहे.
मागे वळून पाहताना गेल्यावर्षी हिंदीत सर्वाधिक गाजलेला बायोपिक म्हणजे 'संजू'. अभिनेता संजय दत्तच्या वादग्रस्त जीवनावर दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी टाकलेला तो एक दृष्टिक्षेप होता. याखेरीज नंदिता दास दिग्दर्शित नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'मंटो'ही चर्चेत राहिला. हाॅकीपटू संदीप सिंग यांच्या जीवनावरील दिलजीत दोसांजच्या 'सूरमा'नेही लक्ष वेधून घेतलं.
मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूर मावळा असलेल्या कोंडाजी फर्जंदच्या जीवनावरील 'फर्जंद' या चित्रपटाने प्राइम टाईम शोसाठी लढा देत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. '... आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाने बॅाक्स आॅफिसवर यश मिळवत हिंदी चित्रपटांनाही पायउतार व्हायला भाग पाडलं.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं वर्ष 'बायोपिक'च्या दृष्टिने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या वर्षाच्या सुरुवातीपासून थोरामोठ्यांची जीवनगाथा सांगणारे 'बायोपिक' रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यात काही सिनेमे वादग्रस्तही ठरण्याचीही शक्यता आहे. या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे येत्या शुक्रवारी दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा 'भाई - व्यक्ती की वल्ली' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेले साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचं जीवनचरित्र उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटात सागर देशमुखने पुलंची तर इरावती हर्षेने सुनीताताईंची भूमिका साकारली आहे.
'देवदास' या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. भगवानदादांच्या जीवनावर 'एक अलबेला' बनवणारे दिग्दर्शक शेखर सरतांडेल या सिनेमाच दिग्दर्शन करणार आहेत. यात देवदास, पारो आणि चंद्रमुखी कोण बनणार याची उत्सुकता आहे.
तर, क्रांतिकारक भाई कोतवाल याचं चरित्र 'शहीद भाई कोतवाल' या 'बायोपिक'मधे पहायला मिळेल. या चित्रपटात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष पत्की याने भाईंची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शन देवीदास भंडारे यांचं आहे.
पहिल्या महिला डॉक्टर डाॅ. आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही", हे धाडसी वक्तव्य करणाऱ्या डॅा. आनंदीबाई यांचं चरित्र 'आनंदी गोपाळ' या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर उतरवण्यात येणार आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी हे शिवधनुष्य उचललं आहे.
'लालबागची राणी' बनलेली वीणा जामकर प्रेक्षकांना रमाबाई आंबेडकरांच्या रूपात भेटणार आहे. दिग्दर्शक बाळ बरगाले यांच्या 'रमाई' या चित्रपटात वीणाचं हे ऐतिहासिक रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सध्या सुरू आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई या दोन महान व्यक्तिरेखांमधील नातंही या चित्रपटात अधोरेखित करण्यात आलं आहे.
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबत मोलाची कामगिरी बजावल्यानंतर तिथल्या राजकारणाला नवी दिशा देणारे तेलुगू सुपरस्टार एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारित असलेला 'एनटीआर' हा चित्रपट ९ जानेवारीला रिलीज होणार आहे. यात नंदमुरी बालकृष्ण शीर्षक भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या जोडीला विद्या बालन आहे. तेलुगू भाषेतील हा चित्रपट भविष्यात इतर भाषांमध्येही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
११ जानेवारी रोजी माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील 'अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विजय गुट्टे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटावरून सध्या काहीसं वादंग उठलं आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांनी शीर्षक भूमिका साकारली असून, अक्षय खन्ना पॅालिटीकल कमेंटेटरच्या भूमिकेत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या चित्रपटाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली असून, या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित होणारा हा चित्रपट ट्रेलरपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतं. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसेने केलं असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासातील बऱ्याच मुद्द्यांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या 'मणिकर्णिका' या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे. आजवर कधी ग्लॅमरस, तर कधी खलनायकी भूमिका साकारलेल्या कंगनाने या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई साकारली आहे. अतुल कुलकर्णी तात्या टोपेंच्या भूमिकेत आहे. हा चित्रपटही 'ठाकरे'सोबत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 'ठाकरे'मुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे सरकवण्यात येण्याची शक्यता चित्रपटसृष्टीतील जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. खरं चित्र लवकरच समोर येईल. मॅथमॅजिशियन आनंद कुमार यांच्या जीवनातील यशाचं सूत्रं सांगणाऱ्या 'सुपर ३०' या चित्रपटात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
दिग्दर्शक ओम राऊत 'तानाजी' या चित्रपटावर मागील वर्षभरापासून काम करत आहे. या चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय देवगण दिसणार आहे. या चित्रपटासाठी ओमप्रमाणेच अजयही खूप मेहनत घेत असल्याचं समजतं.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर 'स्वातंत्र्यवीर' हा चित्रपट आकाराला येत आहे. या चित्रपटात प्रसाद ओक शीर्षक भूमिकेत आहे. विजू मानेच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'सत्यशोधक' या चित्रपटात संदीप कुलकर्णी फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन निलेश जळमकर करीत आहेत.
याशिवाय 'हिरकणी', 'ताठ कणा', 'रघुवीर' या बायोपीकचीही तयारी सुरू असल्याचं समजतं. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार दिसणार आहेत हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दक्षिणेकडील बोल्ड अभिनेत्री शकीलाच्या जीवनावर आधारित असलेल्या 'शकीला' या चित्रपटात ऋचा चढ्ढा आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकसाठी श्रद्धा कपूर सायना बनली आहे. 'संजू' चित्रपटात संजय दत्त यांची भूमिका लीलया साकारणारे परेश रावल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपीकमध्ये दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. अॅालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रांच्या बायोपिकमध्ये हर्षवर्धन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हे सर्व चित्र पाहता २०१८ मध्ये आलेलं 'बायोपिक'चं पीक २०१९ मध्ये आणखी वाढणार असल्याचं दिसतं. या चित्रपटांखेरीज आणखी काही 'बायोपिक्स'ची तयारी प्राथमिक पातळीवर सुरू आहे. त्यापैकी काही चित्रपट अचानक समोर येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यंदाही प्रेक्षकांना थोरामोठ्यांची चरित्रं रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा-
फ्लॅशबॅक २०१८ : बालरंगभूमी 'मोठी' झाली!
'मी पण सचिन' मध्ये झळकणार अभिजीत खांडकेकर