बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांऐवजी 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांना याची जाणीव व्हावी म्हणून महानगरपालिकेने दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे.
तसेच उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याचे विभाग कार्यालय (वॉर्ड) स्तरावर पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात घन कचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक, उपद्रव शोधक (एनडी स्टाफ) आणि मुकादम अशा तिघांचा समावेश राहणार आहे.
उघड्यावर कचरा जाळल्याने त्यातून विषारी वायू, कणयुक्त पदार्थ इत्यादी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते आणि श्वसनाचे आजार बळावतात. आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कोणी आढळल्यास स्वच्छता उपविधी तरतुदीनुसार शंभर रुपये इतकाच दंड आकारला जात होता.
दंडाची रक्कम तुलनेने कमी असल्यामुळे नागरिकांना याबाबत गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यापुढे जर कोणी उघड्यावर कचरा जाळताना आढल्यास त्यास जागेवरच 1 हजार रुपये इतका दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांनी सांगितले.
हेही वाचा