ठाणेकरांच्या (thane) सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण शहरभर बसविण्यात आलेल्या 1400 पैकी 112 सीसीटिव्ही कॅमेरे (cctv camera) गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. बंद झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे.
त्यावर पर्याय म्हणून ठाणे महापालिकेने (tmc) आता बंद कॅमेऱ्यांच्या जागेवर पोलिस योजनेतील कॅमेरे बसविण्याचा विचार सुरू केला आहे. तशा सुचना पालिकेकडून पोलिसांना करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे, कळवा (kalwa) आणि मुंब्रा (mumbra) शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने 1 हजार 400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस करण्यासाठी पोलिसांना मदत झाली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणी, झाडांच्या फांद्या पडणे, वारा, पाऊस यामुळे बंद होत असल्याचे यापुर्वी समोर आले होते. या कॅमेऱ्यांची पालिकेक़डून दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येत असत.
2016, 2017 आणि 2018 या तीन वर्षात हे कॅमेरे संपुर्ण शहरात बसविण्यात आले आहेत. त्यासाठी नगरसेवक निधीही वापरण्यात आला होता.
हे कॅमेरे बसवून सात ते आठ वर्षांचा काळ लोटला आहे. यातील अनेक कॅमेरे आता नादुरुस्त होऊ लागले आहेत. असे काही कॅमेरे पालिकेने यापुर्वी काढून त्याजागी नवीन कॅमेरे बसविले आहेत.
परंतु गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही रुळावर आलेली नाही. नवीन कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नादुरुस्त कॅमेरे काढून त्याजागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण शहरभर बसविण्यात आलेल्या 1400 पैकी 112 सीसीटिव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.
ठाणे शहरात बंद कॅमेरे काढून त्याजागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी 25 ते 30 लाखांच्या निधी आवश्यकता आहे. परंतु या कामासाठी पालिकेकडे निधीच उपलब्ध नाही.
दरम्यान, ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर ते बदलापूर या शहरात सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
कॅमेरे बसविण्याच्या कामाला सुरूवातही झाली आहे. त्यामुळे निधी अभावी बंदावस्थेत असलेल्या कॅमेऱ्यांच्या ठिकाणी पोलिस योजनेतील कॅमेरे बसविण्याचा पर्याय पालिकेने पुढे आणला असून त्यासाठी पालिकेकडून पोलिसांना तसे कळविण्यात येत आहे.
ठाणे शहरातील बंदावस्थेत असलेले सीसीटिव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात येतात. परंतु काही कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत. त्याचबरोबर पोलिसांकडून शहरात कॅमेरे बसविण्यात येत आहे.
हेही वाचा