मंगळवारी सकाळी मुंबईच्या (mumbai) लालबाग परिसरात सिलिंडर ब्लास्ट होऊन 4 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एक जण गंभीर जखमी आहे.
मुंबई अग्नीशमन दलाच्या म्हणण्यानुसार मेघवाडी इथे सकाळी 5 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींपैकी तीन जणांना चिंचपोकळी येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर एकाला भायखळ्यातील (byculla) मसीना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
लालबाग (lalbaug) मधील डॉ.एस.एस.राव रोड जवळील मेघवाडी सोसायटी क्रमांक 3 येथे स्वयंपाकघरात एलपीजी सिलेंडरचा (LPG cylinder) स्फोट (blast) झाला. या स्फोटात घरातील भांडी तसेच स्वयंपाकघरातील सामान आणि कपडे जळून खाक झाले.
या जखमीत कुंदा मिलिंद राणे (वय 48), अथर्व मिलिंद राणे (वय 10) याचे 5-20 टक्के दोन्ही हात, पाय आणि चेहरा भाजला आहे. वैष्णवी मिलिंद राणे (वय 10) हीचे 15-20 टक्के दोन्ही हात, पाय भाजले आहेत आणि पोटाजवळ काही भाजलेल्या जखमा आहेत.
तसेच अनिकेत विलास डिकवलकर(वय 27) हे 60-70 टक्के भाजले आहेत. तसेच डिकवलकर यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मसीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका घटनेमध्ये, सोमवारी 27 जुलैच्या रात्री मुंबईच्या विक्रोळी (vikhroli) भागात सिलेंडरच्या स्फोटामुळे झोपडीत आग लागल्यानंतर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.
धनंजय मिश्रा (वय 46) हे अंदाजे 99 टक्के भाजून जखमी झाले आहेत तसेच राधेशाम पांडे (वय 47) हे सुमारे 2 टक्के भाजले आहेत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
श्रीराम सोसायटी, संजय नगर इथे एका झोपडीत हा स्फोट झाला होता. अग्नीशमन दल (fire brigade) घटनास्थळी पोहोचण्यापुर्वी उपस्थितांनी पाण्याच्या बादल्या वापरुन आग विझवली. तसेच जखमी व्यक्तींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.