इच्छितस्थळी उतरण्याची काळजी प्रवाशांनी घ्यावी, असं वारंवार सांगण्यात येतं. पण प्रवासी स्थानकावर उतरण्याच्या तयारीत असताना गार्डने त्यांना उतरुच दिलं नाही तर? होय हे अगदी खरं आहे. असाच प्रकार पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमध्ये नालासोपारा स्थानकावर घडला. घडलं असं की नालासोपाऱ्यात पोहोचलेल्या एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत आणि नालासोपाऱ्याला उतरणारे प्रवासीही विरारला पोहोचले. तांत्रिक कारणामुळं हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात असलं, तरी एसी लोकलमध्ये असे घडणारे प्रकार थांबायचं नाव घेत नाहीयेत.
नालासोपारा स्थानकावर ट्रेन पोहोचल्यानंतर गार्ड रेल्वेचा दरवाजा उघडण्याचं बटन दाबण्याचं विसरल्याची माहिती समोर आली आहे. यामुळंच नालासोपारा स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना विरार स्थानकावर उतरावं लागलं. रेल्वेतील एका प्रवाशानं ट्विटरवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेनंतर रेल्वेने याची दखल घेतली असून या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दुसरी एसी लोकलही दाखल झाली आहे. महिन्याभरापूर्वीच ही लोकल मुंबईत पोहोचली आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार यार्डमध्ये या लोकलची ट्रायल सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉन्सूनपूर्वी एसी लोकल सुरू होण्याच्या आशा धुसरच आहेत. दुसरा रॅक ताफ्यात आल्यानंतर शनिवार आणि रविवार या दोनही दिवशी एसी लोकलची सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा -
१ हजार वैमानिकांचा संपाचा इशारा, जेटपुढील अडचणी वाढल्या
रन वेच्या दुरूस्तीचं काम पूर्ण, रविवारपासून मुंबई एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू