सांताक्रूझ - मुंबई विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांना आता हॅलिकॉप्टरमधून ‘मुंबई दर्शन’ घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यापिठाने हवाई उड्डाणाचे दोन नवे पदवी अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. २४ मार्चला विद्यापिठाच्या गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्यूकेशन आणि पवनहंस यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. असा वेगळा उपक्रम सुरू करणारे मुंबई विद्यापीठ देशातले पहिले विद्यापीठ ठरले आहे.
मुंबई विद्यापिठात बीएससी एरोनॉटिक्स आणि पवनहंसतर्फे ‘एअरक्राफ्ट मेंटनन्स इंजिनिअरिंग’ ही पदवी देण्यात येणार आहे. 24 मार्चला विद्यापिठाच्या विद्यानगरी संकुलातील अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेत पार पडलेल्या सोहळ्यात या वेगळ्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. यावेळी कुलगुरू डॉ. संजय देशमुख, पवनहंस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. बी. पी. शर्मा, एअर कमांडर टी. ए. दयासागर, गरवारे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अनिल कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यापिठात सध्या बीएससी एरोनॉटिक्स अभ्यासक्रम शिकवला जातो. याला कौशल्यावर आधारित शिक्षणाची जोड देण्यासाठी पवनहंस हेलिकॉप्टर इन्स्टिटय़ूट यांनी पुढाकार घेऊन विद्यापिठात हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
28 मार्चपासून सुरू करण्यात येणाऱ्या हवाई उड्डाण अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी घोषणा करण्यात आलेल्या ‘मुंबई दर्शन’ उपक्रमाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात २८ मार्चलाच होणार आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात त्याची प्राथमिक चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी पवनहंसकडून एक हेलिकॉप्टर या प्रयोगासाठी येणार आहे. यामध्ये दोन फेरीदरम्यान अशा १६ विद्यार्थ्यांना मोफत मुंबई दर्शन घडवण्यात येणार आहे. यामध्ये कल्याण आणि कर्जतच्या पुढील विद्यार्थी, भायंदर आणि रायगड पुढील विद्यार्थी तसेच विद्यानगरी येथील ४ वसतिगृहामधील मुले आणि मुली मिळून १६ विद्यार्थ्यांना मोफत मुंबई दर्शन घडवले जाणार आहे. सदर कार्यक्रम २८ मार्चला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कलिना येथे सकाळी ९.१५ वाजता पार पडणार आहे.
या अभ्यासक्रमासाठी पात्रता
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) पात्रता असून या अभ्यासक्रमासाठी ६० प्रवेश क्षमता आहे. हा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.