Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांचीही होणार बायोमेट्रिक हजेरी


बेस्ट कर्मचाऱ्यांचीही होणार बायोमेट्रिक हजेरी
SHARES

आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कायमस्वरुपी मदत करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी दर्शवली असली तरी प्रशासनाने ही मदत देताना बेस्टच्या कर्मचारी व कामगारांची दैनंदिन हजेरीही बायो-मेट्रीक प्रणालीद्वारे नोंदवण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने केली आहे. तसेच बेस्ट प्रवाशांसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, या सर्व शिफारशी स्वीकारुन त्याप्रमाणे त्यांची अंमलबजावणी करत असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले.


तंत्रज्ञानाचा अवलंब

बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत करण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपक्रमाला काही शिफारशी अंमलात आणण्याची सूचना केली आहे. यामध्ये मध्यम कालावधीच्या उपाययोजना म्हणून तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या केल्या आहेत.


प्रवाशांची संख्या कशी वाढवाल?

परिवहन सेवेत प्रवासी संख्या वाढवण्यासाठी सेवेची गुणवत्ता वाढवणे, प्रवाशांमध्ये बस सेवेबाबतची विश्वासार्हता निर्माण करणे, सेवेमध्ये वेळेची नियमितता राखणे, या परिमाणांच्या अनुषंगाने बेस्ट प्रशासनाने सेवेचा दर्जा उंचावणे, तसेच प्रवाशांच्या सोयीकरता तसेच उपक्रमाच्या कामकाजात सूसुत्रता आणण्याकरता अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोबाईल अॅपच्या माध्यमातून बसमार्गाबाबतची माहिती, बस स्थानक याठिकाणी बस प्रवर्तनाच्या नियंत्रणाकरता व्हीटीएस सिस्टीम आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.


सर्व करारांबाबत पुनर्वाटाघाटी

तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी मध्यम कालावधीकरता सहा उपाययोजना महापालिकेच्या वतीने सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये बेस्ट उपक्रमातील कर्मचारी व अधिकारी यांची दैनंदिन हजेरी बायोमेट्रिक प्रणालीत नोंदवणे, बेस्ट उपक्रमाने इंडियन अकाऊंटिंगनुसार त्यांचे लेखे परिरक्षित करणे, संचित घसारा रकमेनुसार अॅसेट रिप्लेसमेंट फंड तथा अक्युम्युलेटेड  डेप्रिसिएशन फंड निर्माण करणे, सद्यस्थितीतील ऊर्जा पुरवठादारासह इतर केलेल्या सर्व करारांबाबत पुनर्वाटाघाटी करणे आदी सूचना केल्या आहेत.


आधुनिक मीटर प्रणाली

विजेची चोरी-गळती कमी करण्याच्या दृष्टीने तसेच वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्याबाबत ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. याकरता आधुनिक मीटर प्रणाली अवलंबण्यात यावी, तसेच वीज पुरवठा व परिवहन सेवा यामध्ये अस्तित्वात असलेले दक्षता विभाग सक्षम करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.


शिफारशी अंमलात आणणार

महापालिका आयुक्तांनी ज्या ज्या शिफारशी सुचवल्या आहेत, त्यांचा अवलंब करण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रमाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचारी कामगारांची बायोमेट्रिक हजेरी नोंदवण्याच्या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असून वीजचोरी रोखण्यासाठी आधुनिक मीटर पद्धती अंमलात आणली जाईल, असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले.



हेही वाचा

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार खात्यात जमा


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा