Advertisement

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा

एवढ्या जोरदार प्रमाणात पाऊस पडत असेल, तर मुंबईच काय जगातलं कोणतंही शहर तुंबेल, असा दावा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा
SHARES

मुंबईत बुधवारी अवघ्या ४ तासांमध्ये ३०० मिमी विक्रमी पाऊस पडला. गेल्या ३० वर्षांत मी असा पाऊस कधीच बघितलेला नाही. एवढ्या जोरदार प्रमाणात पाऊस पडत असेल, तर मुंबईच काय जगातलं कोणतंही शहर तुंबेल, असा दावा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. (bmc commissioner iqbal singh chahal reacts on mumbai rains)

पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळ आज भिंत खचून सुमारे ५० वृक्ष उन्मळून पडले. त्याची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त आय. एस. चहल आले होते. या पाहणीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वाॅर्ड डी हद्दीत असलेल्या बी.जी.खेर मार्गाची, पाटकर रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंत, अतिजोरदार पावसामुळे एन.एस. पाटकर मार्गावर बुधवार ५ ऑगस्ट २०२० रात्री ११.३० वाजेनंतर कोसळली. त्याचा ढिगारा तसंच झाडे हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गुरूवारी ६ ऑगस्ट २०२० सकाळी केली आणि यंत्रणेला योग्य ते दिशानिर्देश दिले तसंच वाहतूक लवकर पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना देखील आवश्यक सूचना केल्या. यावेळी परिमंडळ उपायुक्त हर्षद काळे, उपायुक्त श्री चंद्रशेखर चोरे, वाॅर्ड डी. सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - निसर्गाचं रौद्ररुप! पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त इकबाल सिंग चहल म्हणाले, मुंबईत बुधवारी ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचं वादळच होतं. केवळ दक्षिण मुंबईतच हे वादळ होतं. कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसराला पावासाने अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत फक्त ४ तासांत ३०० मिमी पाऊस पडला. मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे. २६ जुलैलाही मी मुंबईत होतो. पण असा पाऊस कधीच बघितलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पंप लावून त्या त्या भागातील पाण्याचा निचरा करण्यात आला. हिंदमाता परिसरातही पाणी तुंबलेलं नाही. बुधवारी जेजे रुग्णालयात संध्याकाळी तुंबलेल्या पाण्याचा आम्ही रात्री १० वाजेपर्यंत निचरा केला. पावसाचा जोर ओसरताच पाण्याचा निचराही झाला. या दरम्यान साचलेल्या पाण्यात अडकलेले मुंबईकर, प्रवासी यांची रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून सुटका करण्यात आली. अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. या लोकांच्या राहण्याची तसंच भोजनाची सोय महापालिकेकडून करण्यात आली होती, अशी माहिती देखील इकबाल सिंग चहल यांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा