मुंबईतील काही रस्त्यांची कामं ही पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये कंत्राटदारांनी कामे अर्धवट टाकूनच पळ काढल्याची बाब समोर अाली आहे. वांद्रे ते सांताक्रूझ पश्चिम भागांमधील रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या कंत्राटदारानं वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व भागांतील ५ रस्त्यांची कामे अर्धवटच सोडली आहेत. एवढंच नव्हे तर दहिसरमधील एस. एन. दुबे मार्गाचंही काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याऐवजी ते अर्धवट ठेवून कंत्राटदारानं पळ काढला अाहे.
वांद्रे पश्चिम येथील काही रस्ते व चौकांचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार मनदीप एंटरप्रायझेस या कंपनीला काळ्या यादीत का टाकू नये, अशाप्रकारची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, याच कंत्राटदारानं वांद्रे ते सांताक्रूझमधील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायच्या असलेल्या ५ रस्त्यांची कामं अपूर्ण ठेवली आहेत. सांताक्रूझ पूर्व येथील शिवसेनेचे नगरसेवक सदा परब यांनी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबती तीव्र चिंता व्यक्त केली.
एच पूर्व विभागात प्राधान्य तीनअंतर्गत २३ रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली. यापैकी ११ रस्त्यांची कामं ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायची होती. परंतु प्रत्यक्षात ५ रस्त्यांची कामंच पूर्ण झाली असून कंत्राटदारच पळून गेल्यामुळे यावर जर खड्डे पडल्यास जबाबदार कोण? असा सवाल सदा परब यांनी उपस्थित केला. या विभागातील रस्त्यांचे कामही मनदीप एंटरप्रायझेस या कंपनीकडेच आहे.
प्राधान्य क्रमांक ३ अंतर्गत हाती घेतलेल्या आर उत्तर विभागातील दहिसर पूर्व येथील एस. एन. दुबे मार्गाचे काम हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणं आवश्यक होतं. परंतु प्रत्यक्षात हे काम अर्धवट सोडून कंत्राटदार निघून गेल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी स्थायी समितीच्या सभेत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केला.
एस.व्ही.रोड येथील पश्चिम द्रूतगती महामार्गापासून ते रावळपाडाच्या पुढील परिसरात या रस्त्यांच्या विकासाचं काम हाती घेण्यात आलं. यासाठी आर. जी. शहा या कंपनीला काम दिलं. परंतु कंत्राटदारानं हे काम केवळ मच्छीमार्केटपर्यंतच डांबरीकरण केलं. पुढील भागाचं काम अर्धवट सोडून दिलं आहे. पुढील रस्ता हा पेव्हरब्लॉकचा अाहे. मात्र पेव्हरब्लॉकही अनेक ठिकाणी खचलेले अाणि निखळलेल्या स्वरूपात आहेत. अाता कंत्राटदारच पळून गेल्यामुळे हे काम कोण करणार, असा सवाल पाटेकर यांनी उपस्थित केला आहे.
आर-मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या हे काम थांबवलं असून उर्वरित काम पावसाळ्यानंतर पूर्ण केलं जाईल, असं सांगितलं. कंत्राटदार पळाला नसून त्या रस्त्यांची जबाबदारी त्याचीच आहे. परंतु या रस्त्यांचे काम करताना रात्रीच्या वेळी त्याला त्रास देणं, धमकावणं, अडचणी आणणं अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्या कंत्राटदाराला पावसापूर्वी हे काम करता आलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
ग्रँटरोडच्या शौचालयात सापडली गुहा! बाहेर निघाल्या बारबाला!!
पालिकेव्यतिरिक्त रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी सरकारचीच - महापौर