मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील झोपड्यांवर बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या १२ झोपड्यांवर कारवाई करत अतिक्रमणाचा विळखा सोडवण्यात आला आहे.
अंधेरी पश्चिम येथील मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचं काम महापालिकेने हाती घेतलं आहे. या रुंदीकरणात लिंक रोडवरील स्टार बाजार येथील १२ बांधकामे अडथळा ठरत होती. या सर्व पक्क्या स्वरुपाच्या बांधकामांवर बुधवारी के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान के पश्चिम विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पोलिस उपस्थित होते.
नाल्यावरील ही अतिक्रमणे तोडल्याने नाल्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या नाल्याच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर आसपासच्या भागात पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल.