Advertisement

अंधेरी पश्चिमेतील कॅफे हेवनचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त


अंधेरी पश्चिमेतील कॅफे हेवनचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त
SHARES

अंधेरी पश्चिम येथील मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर हॉटेलसाठी करण्यात येणाऱ्या ‘कॅफे हेवन’ या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी महापालिकेचा हातोडा चालवण्यात आला. हॉटेलने सुमारे 300 ते 400 चौरस फुटांच्या जागेवर वाढीव बांधकाम केले होते. त्यामुळे महापालिकेने काही दिवसांपूर्वी त्यांना नोटीस बजावली होती. या नोटीशीनंतर महापालिकेने कॅफे हेवनच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याची माहिती के /पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली .

जोगेश्वरी पश्चिम परिसरातील जुहू- गोरेगांव लिंक रोड जवळ असणाऱ्या ‘लिंक प्लाझा’ या इमारतीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याच इमारतीच्या समोर असणाऱ्या दुसऱ्या एका इमारतीतही व्यवसायिक स्वरुपाची 4 दुकाने अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. ही सर्व अनधिकृत बांधकामे शुक्रवारी करण्यात आलेल्या धडक कारवाई करत तोडण्यात आली आहेत. ही कारवाई करण्यासाठी पोलीस दलाचे 6 पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे 10 कामगार कर्मचारी-अधिकारी कार्यरत होते. तसेच या कारवाईसाठी 1 जेसीबी व 1 डंपर देखील वापरण्यात आला असल्याची माहिती प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

रफीनगर नाल्यावरील 77 झोपड्यावर कारवाई

गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये दुर्गा सेवा संघाजवळील भागात रफीनगर नाल्याच्या पात्रात दोन्ही बाजूला 77 झोपड्या उभ्या राहिल्या होत्या. या झोपड्यांमुळे या परिसरातील नाल्याच्या रुंदीकरणाचे काम मागील 8 वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार या झोपड्यांची पात्रता निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी सांगितले.

नाल्यांवरील या झोपड्यांच्या कारवाईमुळे नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामांना गती प्राप्त होणार आहे. ज्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत या परिसरातील अहिल्याबाई होळकर मार्ग, 90 फूटी मार्ग आणि शिवाजीनगर बेस्ट बस डेपो आदी परिसरातील पाण्याचा निचरा जलदगतीने होईल. परिणामी या भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होऊन या भागातील वाहतूकही सुरुळीत होईल,असा विश्वास किलजे यांनी व्यक्त केला. या कारवाईत मुंबई पोलीस दलाचे 46 पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे 25 कामगार-कर्मचारी-अधिकारी कार्यरत होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा