Advertisement

गोराईकरांची होणार दूषित पाण्याच्या समस्येतून सुटका


गोराईकरांची होणार दूषित पाण्याच्या समस्येतून सुटका
SHARES

गोराई दोन या भागात अनेक वर्षांपासून जलवाहिन्या जीर्णावस्थेत असल्याने येथील नागरिकांसमोर दूषित आणि कमी दाबाच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे. पण आता या समस्येतून गोराईकरांची लवकरच सुटका होणार आहे. कारण गोराई दोन या म्हाडा वसाहतीतील महापालिकेच्या निधीतून नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर लवकरच येथील रहिवाशांना पुरेसं पाणी मिळणार आहे.


म्हणून जलवाहिन्यांची अवस्था अशी

बोरीवली पूर्व गोराई दोन हा संपूर्ण परिसर खाडीलगत असून म्हाडाने याठिकाणी गृहसंकुल बांधताना सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकल्या होत्या. पण खाऱ्या हवामानामुळे या जलवाहिन्या जीर्ण होऊन अनेक भागांमध्ये गळती लागली होती. परिणामी या गळक्या जलवाहिनीतून स्थानिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असे. त्यामुळे मागील ४ वर्षांपूर्वी तत्कालिन काँग्रेस नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी या भागात जलवाहिनी बदलण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर स्थानिक काँग्रेस नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी यासाठी पुढे पाठपुरावा कायम ठेवल्यामुळे या भागात जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या भागात जलवाहिनी बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं असून याचा शुभारंभ स्थानिकांच्याहस्ते करण्यात आला आहे.


आता समस्या सुटणार

या भागातील लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे जुन्या झालेल्या ६ इंच व्यासाच्या जलवाहिनीऐवजी ९ इंच व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. यामुळे निश्चितच या भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल. यामुळे लोकांना अधिक पाणी तर मिळेल शिवाय पूर्वीप्रमाणे दूषित पाण्याच्या समस्येला सामोरे जावं लागणार नाही, असा विश्वास नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी व्यक्त केला. ही जलवाहिनी बदलण्यासाठी माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी २०१२ पासून प्रयत्न करत होते, अशीही माहिती कोरगावकर यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा