Advertisement

आरे वसाहतीत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय

एक नवीन 'राणीची बाग' मुंबईकरांसाठी गोरेगावं परिसरातील आरे कॉलनीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना आणखी एका राणी बागेचं दर्शन घडणार आहे.

आरे वसाहतीत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय
SHARES

मुंबईसह उपनगरातील अनेक रहिवाशी भायखळा येथील राणीच्या बागेत भेट देतात. राणी बागेतील प्राणी, पक्षी आणि पेंग्वीन यांना पाहण्यासाठी नेहमीच लहानग्यांपासून मोठ्यांची गर्दी असते. मात्र, अशीच एक नवीन 'राणीची बाग' मुंबईकरांसाठी गोरेगावं परिसरातील आरे कॉलनीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांना आणखी एका राणी बागेचं दर्शन घडणार आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोरेगावमधील आरे वसाहतीत नवीन राणीची बाग वसविण्याच्या प्रस्तावावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा करार करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनंगटीवार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.

उत्तम पर्यटनस्थळ

आरे वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम उपनगरातील लोकांना प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी थेट भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापर्यंत यावे लागते. मात्र तेथील रहिवाशांसाठी उत्तम दर्जाचं पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आरे कॉलनीत हे प्राणीसंग्रहालय विकसित करण्यात येत आहे.

निसर्ग शिक्षण केंद्र

आरे वसाहतीत राणी बाग शिक्षण आणि मनोरंजन अशा दोन्ही हेतूनं उभारण्यात येणार आहे. मात्र, मनोरंजनावर भर न देता दुर्मीळ वन्यजीवांच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन केंद्र म्हणून तसंच निसर्ग शिक्षण केंद्र म्हणून हे प्राणीसंग्रहालय साकारलं जाणार आहे. त्याशिवाय, जीवसृष्टीत मोठ्या संख्येनं असलेल्या निशाचर प्राण्यांचं व सरपटणाऱ्या प्राण्यांचं अभ्यासपूर्ण निरीक्षण करता यावं, यासाठी सिंगापूर येथील प्रसिद्ध नाईट सफारीच्या संकल्पनेवर आधारित येथे 'नाईट झू सफारी' विकसित करण्यात येणार आहे.

प्रकल्प मागे

राज्य सरकारच्या सहकार्यानं पालिकेनं आरे वसाहतीत प्राणीसंग्रहालय सुरू करण्याचा प्रकल्प आखला होता. मात्र जिजामाता उद्यान आरे वसाहतीत हलवण्याचा हा घाट असल्याचा कांगावा करीत काही राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. जिजामाता उद्यानाची मोक्याची जागा विकण्याचं घाटत असल्याचाही आरोप त्यावेळी करण्यात आला. त्यामुळं आरे वसाहतीतील प्राणीसंग्रहालयाचा हा प्रकल्प मागेच राहिला होता.

सामंजस्य करार

आरे वसाहतीत प्राणीसंग्रहालय विकसित करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि पालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठीचा मसुदा राज्य सरकारकडं सन २०१४ मध्ये पाठवण्यात आला आहे. मात्र, तो अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यामुळं हा करार करून पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता पालिका प्रशासनानं स्थायी समितीची मंजुरी मागितली आहे. आरे वसाहतीतील प्रस्तावित प्राणीसंग्रहालय हे जिजामाता उद्यानाचा विस्तारित भाग असल्याचंही प्रशासनानं या प्रस्तावात स्पष्ट केलं आहे.

१ रुपया भाडेतत्त्वावर  जागा

राज्य सरकार आणि पालिका यांच्यात करार केल्यानंतर ९९ वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया भाडेतत्त्वावर ही जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या जागेचा मालकी हक्क राज्य सरकारकडंच राहणार आहे. जागा हस्तांतरित केल्यापासून ४ ते ५ वर्षांत प्राणीसंग्रहालयाचा विकास करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेची राहणार आहे, तर प्राणीसंग्रहालयातून येणारा निव्वळ महसूल पालिका व राज्य सरकार यांनी ठरावीक प्रमाणात वाटून घ्यायचा आहे. या प्रकल्पासाठी ५०० कोटींचा खर्च पालिकेनं अंदाजित केले आहे.



हेही वाचा -

मुंबई वाहतूककोंडीत जगात अव्वल, दिल्ली चौथ्या स्थानी

गायीचं दूध २ रुपयांनी महागणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा