मुंबई - सर्वसामान्यांसाठी असलेल्या एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) चोरून तो स्वत:च्या घशात घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस बिल्डरांकडून वाढत चालले आहेत. याचा फटका रहिवाशांसह मुंबई महानगर पालिकेला बसत आहे. एफएसआय चोरींच्या तक्रारीही पालिकेकडे वाढत चालल्या आहेत.या एफएसआय चोरीची आता पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंत लाखोंचा एफएसआय लाटणाऱ्या आणि यापुढेही एफएसआय लाटू पाहणाऱ्यांची यापुढे खैर नाही. कारण एफएसआय चोरांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. एफएसआय अनियमिततासंबंधीच्या सर्व तक्रारींविरोधात कारवाई करत एफएसआय चोरांना नोटीसा बजावण्याचे आदेश मेहता यांनी सर्व विभागांना दिले आहेत. आधी अनिवासी बांधकामात एफएसआय चोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी आणि त्यानंतर निवासी बांधकामातील एफएसआय चोरांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मेहता यांनी उपायुक्तांना दिले आहेत.