मुंबईतील 'पैसे भरा आणि वापरा' तत्वावरील सार्वजनिक शौचालय वापरकर्त्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ज्या शौचालयांमध्ये या नियमांचं पालन होत नाही तसंच ज्या शौचालयात स्वच्छता राखली जात नाही, अशी शौचालये महापालिका ताब्यात घेत आहे. आतापर्यंत अशाप्रकारे ४४ सार्वजनिक शौचालये ताब्यात घेण्यात आली असून याठिकाणी आता नि:शुल्क सेवा सुरू होणार आहे.
मुंबईतील सार्वजनिक शौचालयांमध्ये नि:शुल्क सेवा दिली जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर सर्व शौचालयांची पाहणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार या पाहणीचा आढावा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्या मासिक सभेच्या आढावा बैठकीत घेतला. यावेळी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.
‘पैसे भरा व वापरा’ या संकल्पनेवर आधारित सशुल्क शौचालयांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सशुल्क शौचालयांना स्वतः भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करावी. या पाहणी दरम्यान सदर ठिकाणी स्वच्छता नसणे, निर्धारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारणे किंवा शौचालयाचा नियमबाह्य वापर होणे; या ३ पैकी कोणतीही एक बाब आढळून आल्यास अशा शौचालयांना तात्काळ नोटीस देऊन ते ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु करावी, असे आदेश पुन्हा एकदा दिले आहेत.
तसंच ३ उल्लंघनांपैकी कोणतंही उल्लंघन नसेल अशा शौचालयांवर वरीलप्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असेही निर्देश शनिवारच्या बैठकीदरम्यान आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रात असणाऱ्या ८९२ शौचालयांपैकी ४४ ठिकाणी वरीलनुसार उल्लंघन केल्याचं आढळून आल्याने ती महापालिकेने ताब्यात घेतली आहेत. या ठिकाणी नि:शुल्क शौचालये उभारण्यासंबंधी कार्यवाही सुरु करण्यात आल्याची माहिती यावेळी विभागाने आयुक्तांना दिली.
जी शौचालये ताब्यात घेण्यात येतील तेथे नवीन शौचालय बांधण्याच्या कार्यवाहीस व संबंधित निविदा प्रक्रियेस सुरुवात करावी. या नुसार बांधण्यात येणारी नवीन शौचालये नि:शुल्क शौचालये असतील, अशाही सूचना केल्या आहेत. नवीन शौचालये बांधण्याची कार्यवाही करताना शौचालयांचं आरेखन (डिझाईन) हे रेल्वे स्थानक, झोपडपट्टी आदी परिसराची गरज ओळखून तयार करण्यात यावी, अशाही सूचना आयुक्तंनी दिल्या आहेत.
हेही वाचा-
मुंबईत फक्त महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह!
LIVE : मुंबई महापालिका बजेट २०१८-१९