मुंबईकरांना २४ तास पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन वचनमाम्यातून देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ही योजनाच कागदावरच आहे. मुंबईतील मुलुंड आणि सांताक्रूझ गझदरबंध या विभागातील काही भाग प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यासाठी ५ वर्षांपासून काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या कंपनीला दिलेल्या ३ वर्षांच्या कालावधीत ही योजना पूर्ण करण्यात महापालिकेला यश आले नसून येत्या डिसेंबरपर्यंत हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावरील काही भागांमध्ये २४ तास पाणी देण्यासाठी एवढी वर्षे लागणार असतील तर मग संपूर्ण मुंबईत ही योजना कार्यान्वित होण्यास किती वर्षे जातील? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मुंबईकरांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच जलवितरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेने 'सुएझ एन्व्हायर्नमेंट इंटरनॅशलन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची निवड केली आहे. या सल्लागार कंपनीच्या शिफारशीनुसार मुलुंड टी विभागातील एक भाग आणि एच पश्चिम विभागातील सांताक्रूझ गझदरबंध या भागात प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाणी पुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
परंतु ही योजना हाती घेऊन ५ वर्षे उलटत आली तरी या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटरच्या खरेदीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी होईल, असा दावा केला आहे.
मुंबईतील पाण्याची जलवितरण व्यवस्था मोठी आहे. त्यामुळेच या सल्लागारांच्या माध्यमातून गळती, जीआयएस मॅपिंग यासह वास्तवदर्शी प्रकल्प हाती घेऊन ही सुधारणा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार मुंबईत समान पाणी वाटप धोरणासाठी लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली समिती गठीत आली आहे. त्यानुसार त्यासर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
सध्या आमदार आणि नगरसेवकांशी चर्चा होणे शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या झोपडपट्टयांना माणशी ११० लिटर पाणी दिले जात असून शहरांमध्ये १४५ लिटरपर्यंत माणसी पाणी पुरवठा केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
हा प्रस्ताव मंजुरीला आला असता काँग्रेसच्या आसिफ झकेरिया यांनी या जलवाहिनी टाकण्यासाठी बनवलेले रस्ते खोदले जात असल्याची तक्रार नोंदवली. तर सपाचे रईस शेख यांनी मुंबईकरांना पाण्याचे समान वाटप व्हावे यासाठी बनवलेल्या समितीचा अहवाल सादर केला जावा, अशी मागणी केली. भाजपाचे मनोज कोटक यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे वचनमाम्यातून सांगत आलो आहोत. पण अजूनही हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पच कागदावर असल्याचे सांगत नक्की हा प्रकल्प कुठे रखडला याची माहिती द्यावी, अशी सूचना केली.
त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची निश्चित तारीख सांगावी तसेच या प्रकल्पासाठी स्पेशल टास्कफोर्स तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबईकरांना २४ तास पाणी मिळाल्यानंतर तर सुएझ कंपनी इथून जाणार का? असा सवाल करत हे २४ तास पाणी मिळणार कधी? आणि पाण्याचे समान वाटप होणार कधी? असा सवालही त्यांनी केला. यावेळी झालेल्या चर्चेत अलका केरकर, राजुल पटेल आदींनी भाग घेतला होता.