'जेएनयू' हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथं विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचं मुंबई उच्च न्यायालयानं कौतुक केलं आहे. 'शांततेत आंदोलन करून आपल्या आवाजाची ताकद अधिकाधिक कशी वाढवायची याचे धडे सध्याची तरुणाई सगळ्यांना देत आहे. इतरांनी त्यांच्याकडून ते शिकायला हवे’, अशा शब्दांत उच्च न्यायालयानं आंदोलनाची बुधवारी दखल घेत कौतुक केलं.
शिवाजी पार्क हे खेळाचे की मनोरंजनात्मक मैदान आहे याबाबत ‘वी-कॉम ट्रस्ट’नं केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या.रियाज छागला यांच्या खंडपीठानं तरुणांच्या आदोलनांची दखल घेत त्याचे कौतुक केलं.
'सध्या लोक एकत्र येऊन शांततेत निषेध करायला लागले आहेत. अशा आंदोलनाद्वारे त्यांच्या आवाजाची ताकद आणखी वाढत असल्याचं त्यांना जाणवू लागलं आहे. यात सध्याची तरुणाई आघाडीवर असून शांततेत आंदोलन कसं करावं आणि त्याद्वारे आपल्या आवाजाची ताकद अधिकाधिक कशी वाढवावी याचे तरुणांकडून धडे दिले जात आहेत. इतरांनी विशेषत: ज्येष्ठांनी हे समजून घ्यायला हवे आणि शिकायला हवं’, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
शिवाजी पार्कवर खेळाव्यतिरिक्त अन्य उपक्रमांना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयाकडं करण्यात आली आहे. त्यावेळी राज्य सरकार हे शिवाजी पार्कचं विश्वस्त आहेत. त्यांना हे मैदान खेळाव्यतिरिक्त अन्य उपक्रमांसाठी उपलब्ध करायचं असेल तर न्यायालयानं त्यात हस्तक्षेप का करावा, असा सवाल केला. तसंच, न्यायालयानं प्रत्येक बाबतीत ‘पहारेकरी’ म्हणून काम करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असंही न्यायालयानं सुनावलं. आपण कशाला आव्हान देत आहोत याची जाणीवही लोकांना असायला हवी, असंही न्यायालयानं सुनावलं.
हेही वाचा -
दादर ते केईएम नवी बेस्टसेवा, प्रवाशांना दिलासा
रेल्वे रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत