औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ई-पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला औषध विक्रेत्यांनी आणि ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन (एआयओसीडी)ने विरोध केला आहे. शिवाय त्याविरोधात मंगळवारी एकदिवसीय बंदचीही हाक दिली होती. त्यानुसार सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून मुंबईसह देशभरात बंदला सुरूवात झाली. मात्र या बंदमध्ये काही दिवसांपूर्वीच फूट पडल्याने मुंबईसह राज्यभरातील औषध दुकानं बऱ्यापैकी खुली असल्याचे चित्र आहे.
मुंबईतील 30 टक्के औषध दुकानं सुरू असून, राज्यभरात 12 ते 13 हजार दुकानं खुली असल्याची माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी दिली आहे. तर एआयओसीडीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी मात्र हा दावा फेटाळत बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचे 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले आहे. जी काही दुकानं खुली दिसत आहेत, ती ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून एआयओसीडीकडूनच खुली ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बंदच्या काळात रूग्णांची-ग्राहकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने एफडीएने खासगी-सरकारी रूग्णालयातील औषध दुकानांमध्ये मुबलक प्रमाणात औषधं उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील अनेक रुग्णालयांमधील औषध दुकानांमध्ये औषधं उपलब्ध होत असून, बंदमध्ये सहभागी न झालेल्या औषध विक्रेत्यांची दुकानंही खुली आहेत. त्यामुळे ग्राहकांना, रूग्णांना म्हणावा तसा त्रास होताना दिसत नाही. मुंबईतील 30 टक्के दुकानं खुली असल्याचा दावा तांदळे यांनी केला आहे. तर शिंदे यांनी मात्र 200 ते 300 दुकानंच मुंबईत खुली असून, ही दुकानंही ग्राहकांच्या सोयीसाठी एआयओसीडीकडून खुली ठेवण्यात आल्याचे सांगितले आहे. मुंबई, नवी मुंबई, कोकण, ठाण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही औषध दुकाने बऱ्यापैकी खुली असल्याचे सांगितले जात आहे.
बंदचा फज्जा
'बंदच्या काळात 5 दुकानं तरी खुली राहतात का, हे पाहू' असे म्हणत एआयओसीडीने फार्मासिस्ट संघटनांना आव्हान दिले होते. त्यानुसार फार्मासिस्ट संघटनांनी 5 नव्हे 15 हजार दुकाने खुली असल्याचा दावा करत बंदचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट केले आहे.
विक्रेत्यांवर दबाव
बंदमध्ये सहभागी न होणाऱ्या औषध विक्रेत्यांवर एआयओसीडीकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप तांदळे यांनी केला आहे. 'दुकान खुले ठेवल्यास होलसेलरकडून औषध वितरण बंद करू' अशा धमक्या दुकानदारांना दिल्या जात असल्याने अनेक दुकानदारांनी घाबरून दुकानं बंद ठेवल्याचा आरोपही तांदळे यांनी केला आहे. तर एआयओसीडीने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. ई-पोर्टलचे धोके दुकानदारांना समजले असल्याने ते स्वत:हून बंदमध्ये सहभागी झाले आहेत. तेव्हा त्यांच्यावर दबाव टाकण्याची काय गरज? हे सर्व आरोप चुकीचे आणि जाणीवपूर्वक केले जात असल्याची माहिती महाराष्ट्र केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस अनिल नावंदर यांनी दिली आहे.