मुंबईसह राज्यभरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत चालली आहे. ही वाढ सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ कॉम्प्रेस नॅचरल गॅसच्या (सीएनजी) आणि घरगुती गॅसच्या (पीएनजी) दरात महानगर गॅसनं वाढ केली आहे. त्यामुळं आर्थिक खर्चात वाढ होणार आहे.
८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईत ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपये तर घरगुती गॅसच्या (पीएनजी)दरात प्रतियुनिट ९५ पैशांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सीएनजी प्रतिकिलो ४९.४० रुपये तर घरगुती गॅस (टप्पा १) २९.८५ रुपये आणि (टप्पा २) ३५.४५ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
कोरोनाच्या काळात वाढलेला संचालन आणि मनुष्यबळावरील खर्च अंशत: भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याचं महानगरनं स्पष्ट केलं आहे. याआधी कोरोनाकाळात सीएनजीच्या किमतीत २ वेळा बदल झाले होते. २५ जुलैला सीएनजीच्या दरात १ रुपयांनी वाढ झाली, तर पुन्हा ६ ऑक्टोबरला सीएनजीचे दर १.५ रुपयांनी कमी झाले. या वेळी घरगुती गॅसच्या (पीएनजी) किमतीही ७० पैशांनी कमी झाल्या होत्या. सीएनजीमध्ये करोनाकाळात झालेली ही दुसरी दरवाढ आहे.