कधीही न थांबणारी, अहोरात्र धावणारी अशी मुंबई महानगराची (mumbai) ओळख आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या (coronavirus) दहशतीने मुंबईची गती मंदावल्याचं चित्र शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दोन दिवसांत दिसून आलं. सोमवारी म्हणजेच्या आठवड्याच्या सुरूवातीला देखील एरवी गर्दीने ओसांडून वाहणारे रस्ते काहीसे मोकळे मोकळेच दिसत होते.
घरून काम करण्याला प्राधान्य
कोरोना व्हायरचा (COVID- 19) मोठा परिणाम मुंबईवर पडल्याचं दिसून येत आहे. जसजशी मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललीय. तसतशी मुंबईकरांच्या मनातली धास्ती देखील वाढत चाललीय. अतिवृष्टीने माजवलेला हाहाकार असो किंवा संकटकाळी स्थितीतही जोमाने रस्त्यावर उतरणारे मुंबईकर कोरोनाच्या धोक्यामुळे आपापल्या घरातच राहणं पसंत करत असल्याने ही वेळ आली आहे. खासगी आॅफिसांमध्ये काम करणारे नोकरदार तसंच व्यवसाय करणारे मुंबईकर फोन, कम्प्युटरवरूनच काम करण्याला प्राधान्य देत आहेत.
हेही वाचा- Coronavirus Update: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर
लोकलच्या गर्दीचाही धसका काही मुंबईकरांनी घेतला आहे. लोकलच्या गर्दीत एकावेळेला शेकडो मुंबईकर प्रवास करतात. कितीही प्रयत्न केला, तरी संसर्गापासून वाचणं शक्य होईल की नाही याची खात्री देता येत असल्याने अनेकजण गर्दीने नेहमीच ओसांडून वाहणाऱ्या लोकल ट्रेनला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे. खाण्यापिण्याचे स्टाॅल्स, चाय टॅपरी, पानाच्या टपऱ्यांवरील गर्दीही तुरळक झाली आहे.
कलम १४४ लागू
खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत (mumbai) जमावबंदीचं कलम १४४ (section 144) लागू करण्यात आलं आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लग्न समारंभ, पार्टी, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली असून अनावश्यक गर्दी टाळण्याचं मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. या नियमाचं पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे शनिवार- रविवारी सुट्टी असूनही मुंबईकरांनी माॅल-हाॅटेलमध्ये न जाता तसंच खेळांच्या मैदानांकडे पाठ फिरवून घरीच राहणं पसंत केलं. यामुळे मुंबईतील रस्तेही ओस पडलेले दिसले.