धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या ४९ वर पोहोचली असून करोनाबळींची संख्या पाच झाली आहे. धारावीला कोरोनानं चांगलंच घेरलं असून, धारावी परिसरात सोमवारी आणखी 6 जणांना कोरोनाची बाधा झाली असून एकाचा मृत्यू झाला. घरोघरी सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसंच, त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.
तब्बल ३०० खाटांची क्षमता असलेल्या विलगीकरण केंद्रात संशयितांना भरती करण्यात आलं असून आता इथं जागा नसल्यानं संशयितांना अन्य ठिकाणच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला होता. या रुग्णाचे त्याच दिवशी संध्याकाळी निधन झाले. त्यानंतर धारावीमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
धारावीमध्ये दाटीवाटीने झोपड्या उभ्या असून कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने २४ खासगी डॉक्टरांच्या मदतीने पथकं तैनात केली आहे. या पथकांमध्ये पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि २ आरोग्य स्वयंसेविकांचा समावेश आहे. गेल्या ३ दिवसांमध्ये या पथकांनी वस्त्यांमध्ये फिरून सुमारे १३ हजार २२४ जणांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान ११३ जणांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याचं आढळलं असून त्यांची कोरोनाविषयक चाचणी करण्याची सूचना या पथकांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेनं ८५ जणांची करोनाविषयक चाचणी केली असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.