मुंबईत 26 जुलैच्या महापुरानंतर सर्व विभाग कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष बनवून त्यामध्ये दोन डंपर आणि एक जेसीबीची सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पावसाळ्यात दोन डंपर आणि एक जेसीबीची सेवा घेतली जात होती. परंतु या वर्षापासून या सेवांच्या खर्चालाच कात्री लावण्यात आली आहे.
प्रत्येक वॉर्डात 2 डंपर आणि एका जेसीबीची गरजच नसल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी ही कात्री लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेनंतर अखेर 1 डंपर आणि 1 जेसीबी देण्यास प्रशासन तयार झाले आहे.
मुंबईमध्ये 2005 मध्ये महाप्रलय आल्यानंतर आपत्कालीन नियंत्रण आराखडा तयार करून 24 विभाग कार्यालयांमध्ये एक नियंत्रण कक्ष तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या नियंत्रण कक्षामध्ये दोन डंपर, एक जेसीबी या यंत्रासह कामगार वर्ग आणि एनडीआरएफ तसेच आपत्कालीन विभागाचा कर्मचारी तैनात ठेवण्यात येत होता. परंतु, मागील 12 वर्षांपासून सुरू असलेली प्रथा विद्यमान अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आणि उपायुक्त विजय बालमवार यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जूनपासून विभाग कार्यालयात डंपर आणि जेसीबीच नव्हते.
नुकत्याच झालेल्या घाटकोपरमधील सिद्धीसाई इमारत दुघर्टनेवेळी एन विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या वतीने डंपर आणि जेसीबी मशीन उपलब्ध न झाल्यामुळे आयत्या वेळी खासगी कंत्राटदाराची मदत घेऊन ही सेवा घेण्यात आली. परंतु, ही सेवा मिळण्यास विलंब झाला. आपत्कालीन नियंत्रण कक्षात ही सेवा असती, तर त्वरीत अंमलबजावणीला सुरुवात झाली असती. पण घाटकोपरमध्ये ही सेवा उपलब्ध करून देईपर्यंत बराच अवधी लोटला. परिणामी या ठिकाणी उपाययोजना राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्वरीत उपाययोजना राबवण्यासाठी ही सेवा घेतली जाते. परंतु, महापालिका ही सेवा वेळेवरच पुरवू शकली नाही, तर ढिगाऱ्याखाली दबून अनेकांचे जीव जावू शकतात. त्यामुळे महापालिकेच्या वतीने अनावश्यक काटकसर केली जात असल्याचे बोलले जात आहे. जिथे खरेच काटसकर करायची आहे, तिथे न करता अत्यावश्यक सेवेच्या भागात केली जात असल्यामुळे महापालिकेला भविष्यात टीकेचे धनी व्हावे लागेल, अशी भीती वर्तवली जात आहे.
महिन्याभरापूर्वी घडलेली घाटकोपर इमारत दुर्घटना, मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी विक्रोळी येथे घरांची भिंत कोसळली आणि गुरुवारी भेंडीबाजार जवळील हुसैनीवाला मंजिल इमारत कोसळणे अशा दुर्घटना घडल्या. यामध्येही आजूबाजूच्या विभाग कार्यालयातून डंपर आणि जेसीबी सेवा बाहेरुन भाडेतत्वावर सेवा घेण्यात आल्या होत्या. विभाग कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांकडेे विचारणा केली असता, 8 ते 10 दिवसांपूर्वी यासाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. परंतु, आता विभाग कार्यालयांना 1 डंपर आणि 1 जेसीबी एवढीच यंत्रणा उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विभाग कार्यालयांना डंपर आणि जेसीबी सेवा देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, अधिक बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा -
घाटकोपरमध्ये घराची भिंत पडून एकाचा मृत्यू
घाटकोपरच्या इमारत दुघर्टनेला सितपच जबाबदार, अधिकाऱ्यांची चौकशी