Advertisement

विद्यार्थांनी काय खायचे, काय टाळायचे? एफडीए देणार धडे!


विद्यार्थांनी काय खायचे, काय टाळायचे? एफडीए देणार धडे!
SHARES

रोज रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न. तर तेच तेच डब्यात खाऊन कंटाळलेली मुलं कधी तरी गुपचुप कॅण्टीनमध्ये जाऊन जंकफूडचा आस्वाद घेतात. पण असं जंकफूड खाणं लहान मुलांना महागात पडू शकतं. त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच आता जंकफूड का खाऊ नये? जंकफूड खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात? इतकेच काय, मुलांनी रोज पोष्टिक असे कोणते पदार्थ खावेत? सुरक्षित, स्वच्छ अन्नपदार्थ म्हणजे काय? उघड्यावरचे अन्न-अन्नपदार्थ खाऊ नये अशा एक ना अनेक गोष्टींचे धडे आता अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या माध्यमातून शाळकरी मुलांना देण्यात येणार आहेत.

अन्न सुरक्षा मानके कायदा लागू होऊन बराच काळ झाला असला, तरी सुरक्षित अन्नाबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळेच अन्नबाधा-विषबाधेसारख्या घटना आणि चुकीचा आहार, तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनामुळे विविध प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अन्न, जेवण हे प्रत्येक व्यक्तीशी संबंधित आहे. घराघरात अन्न शिजवले जाते. त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत पोहोचत सुरक्षित अन्नाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय एफडीएने घेतल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख (अन्न) ठाणे, यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.



यानुसार हॉटेल व्यावसायिक आणि धार्मिक स्थळांमध्ये जनजागृती झाल्यानंतर आता एफडीएने आपला मोर्चा शाळकरी मुलांकडे वळवला आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शाळांमधील 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना आहाराचे, सुरक्षित अन्नाचे धडे दिले जाणार आहेत. मुंबईतील 2400 शाळांमध्येही ही मोहीम पुढील आठवड्यापासून राबवण्यास सुरूवात होणार आहे. तर ठाण्यात नुकतीच या मोहिमेला सुरूवात झाली आहे.


दोन चिमुकले देणार धडे!

लहान मुलांना काही सांगायचं, समजवायचं म्हणजे त्यांच्याशी लहान होऊनच बोलावं लागतं. त्यामुळे लहान मुलांना पटेल, समजेल अशा भाषेत, नाट्याच्या, पथनाट्याच्या आणि कवितेच्या माध्यमातून सुरक्षित अन्नाचे धडे दिले जाणार आहेत. त्यातही लहान मुलांना लहान मुलंच योग्यरीत्या त्यांच्या भाषेत सांगू शकत असल्याने या मोहिमेत एफडीएने एक वेगळा प्रयोग केला आहे, तो म्हणजे दोन चिमुकल्यांनाही सहभागी केले आहे. दिल्लीतून आलेले हे दोन चिमुकले मुंबई आणि ठाण्यातील मुलांना सुरक्षित अन्नाचे धडे देणार आहेत.


दिल्लीतील 15 जणांच्या टीमचा 3 महिने मुक्काम

या मोहिमेसाठी एफडीएने खास दिल्लीतून 15 प्रशिक्षकांची टीम बोलावली असून त्यात दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. फुड सेफ्टी अथॉरिटीची ही टीम आहे. तर ही टीम पुढचे तीन महिने महाराष्ट्रात मुक्काम करत मुंबई-ठाण्यासह राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. त्याअनुषंगाने ही मोहीम नोव्हेंबरपासून पुढचे तीन महिने राज्यभर राबवली जाणार आहे.


तक्रारही करता येणार

मुंबई-ठाण्यातील बऱ्याच शाळांतून मुलांना जेवण दिले जाते. तर सर्वच शाळांमध्ये आता कँटिनची सुविधा आहे. मात्र, हे जेवण तसेच कँटिनमधील अन्नपदार्थ सुरक्षित आणि ताजे असतीलच याची काही खात्री नाही. त्यामुळे शाळेतील जेवण आणि कँटिनमधील अन्नपदार्थ सुरक्षित नसतील, स्वच्छ जागेतील अन्न शिजवलं जात नसेल, तर त्याची तक्रार आता विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यासाठी शाळेत तक्रार पेटी लावण्यात येणार आहे.



हेही वाचा

'एफडीए'ला मिळाले ४६ अन्न निरीक्षक 

मुंबईतील 17 हॉटेल्स अस्वच्छ, 'एफडीए'ने पाठवली नोटीस 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा