दक्षिण मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे मुंबईकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय गंभीरपणे घेतली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी झाली. यादरम्यान उच्च न्यायालयाने 'एमएमआरसीएने आपला अहंकार थोडा कमी करावा, आम्हालाच सगळे कळते, आम्ही सांगू तेच योग्य, ही भूमिका बदलायला हवी', अशा शब्दात एमएमआरसीएची कान उघाडणी केली आहे. दक्षिण मुंबईत मोठ्या जोमाने मेट्रो 3 चे काम सुरू असून त्याने इथे राहाणाऱ्या रहिवाशांना मात्र कमालीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गुरुवारच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यालयाने एमएमआरसीएवर जोरदार ताशेरे ओढले. मेट्रोच्या कामांमुळे एखादी इमारत कोसळली, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उच्च न्यायालयाने एमएमआरसीएला विचारला.
दक्षिण मुंबईत मेट्रो 3 च्या मार्गात अनेक जुन्या इमारती आहेत. मेट्रोच्या कामांमुळे अनेक इमारतींना तडे गेल्याचे समोर आले आहे. भविष्यात फोर्ट परिसरातील जुन्या इमारतींना धोका पोहचू नये यासाठी काय उपाययोजना करणार? याची माहिती देण्यास देखील उच्च न्यायालयाने एमएमआरसीएला बजावले आहे.
त्याच बरोबर पुढील सुनावणीपर्यंत मेट्रो 3 ची नाईट शिफ्ट ही बंदच राहणार आहे, तर सेंट पेटीट इमारतीच्या परिसरात काम करण्यास 10 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तयार केलेल्या समितीसोबत मिळून काम करावे असे देखील उच्च न्यायालयाने यावेळी एमएमआरसीएला बजावले.
हेही वाचा -
दादर, माहिमकरांनाही मेट्रो-३ ‘नकोशी’, फूटपाथला भेगा, भिंतींना तडे
सिद्धार्थ काॅलेजला ‘मेट्रो’दुखी, भिंती-पिलरला तडे