आपल्या विभागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण (concrete roads) कामाची माहिती नागरिकांना क्यूआर कोडवरून मिळू शकणार आहे. शहर विभागात रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांसाठी माहिती फलक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘क्यूआर कोड’ स्कॅन (QR code scan)करण्याची सुविधा देखील पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आली आहे.
‘क्यूआर कोड’ मोबाईलवरून स्कॅन केल्यावर नागरिकांना काम सुरू केल्याचा आणि काम संपुष्टात येण्याचा दिनांक, कामाचा कालावधी, रस्त्याची लांबी, रुंदी, कामाचे ठिकाण इत्यादी माहिती उपलब्ध होत आहे.
मुंबई (mumbai) महानगरपालिकेने (bmc) रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. शहर विभागातील रस्त्यांची कामे सुरू होण्यास आधीच उशीर झाला होता.
आधीच्या कंत्राटदाराने कामे सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्यानंतर कंत्राटदाराने न्यायालयात (bombay high court) धाव घेतली होती. या सगळ्या प्रक्रियेमुळे नव्याने कंत्राटदार नेमून प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास ऑक्टोबर 2024 उजाडले.
त्यानंतर शहर भागातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू झाली. त्यामुळे शहर भागातील कामांना वेगच येत नव्हता. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून शहर भागातील रस्त्यांची कामे सुरू झाली असून या कामांना आता वेग आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी रात्री दक्षिण मुंबईतील हुतात्मा स्मारक चौकाजवळील पुरुषोत्तम ठाकूरदास मार्ग आणि काळबादेवी येथील आर. एस. सपारे मार्ग येथील प्रत्यक्ष भेट देऊन काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली.
भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आय. आय. टी. मुंबई) उपसंचालक तथा वरिष्ठ प्राध्यापक के. व्ही. कृष्ण राव या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. शहर भागातील रस्ते कामांची माहिती देण्यासाठी सुरू केलेला ‘क्यूआर कोड’ उपक्रम नागरिकांना माहिती उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचा आहे.
हा उपक्रम इतर विकास कामांच्या ठिकाणी देखील राबविता येईल, असे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे आणि शहर विभागात काँक्रिटीकरण कामांना वेग आला आहे. या कामांचे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणीचे कामकाज सुरू आहे.
आयआयटीच्या टीमने नोंदविलेली निरीक्षणे, महानगरपालिका अभियंत्यांना कार्यस्थळी आलेले अनुभव, प्रत्यक्ष कामकाजातील आव्हाने यावर विचारविनिमय व्हावा, आयआयटी तज्ज्ञांनी संवाद साधावा, महानगरपालिका अभियंत्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी 13 मार्च 2025 रोजी पवई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात विचारमंथन (ब्रेन स्टॉर्मिंग) कार्यशाळा आयोजित करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर (698 रस्ते), तर दुसऱ्या टप्प्यात 377 किलोमीटर (1420 रस्ते) असे एकूण मिळून 701 किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभागातील एकूण 503 रस्त्यांचा समावेश आहे.
हेही वाचा