अंधेरीच्या शेर-ए-पंजाब परिसरामध्ये रविवारी पहाटे ६च्या सुमारास बिबट्या घुसल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा बिबट्या शेर-ए-पंजाब परिसरातल्या गार्डन लेन सोसायटीमध्ये घुसला होता. या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. पहाटे ६ च्या सुमारास गार्डन लेन सोसायटीमध्ये घुसलेल्या या बिबट्याला तब्बल १२ तासांनी, म्हणजेच संध्याकाळी ६.१५ वाजता पकडण्यात वन विभागाच्या यश आलं आहे.
शेर-ए-पंजाबच्या गार्डन लेन सोसायटीमधल्या किडझी नर्सरीमध्ये हा बिबट्या घुसला होता. ५ नंबर बिल्डिंगमध्ये ही नर्सरी आहे. या किडझीमधलं सीसीटीव्ही फुटेज 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागले असून त्यामध्ये हा बिबट्या तिथल्या बेंचवर दिसत आहे. सकाळी ६ वाजता हा बिबट्या इमारतीत शिरला आहे. एमआयडीसी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिसर सामान्यांसाठी बंद केला होता.
दरम्यान, बिबट्या अजून इमारतीमध्येच असल्यामुळे इमारतीत घरांमध्ये असलेल्या रहिवाशांना घरातच दारे-खिडक्या बंद करून बसण्यास सांगण्यात आले होते.
बिबट्या घुसल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवत सुरक्षा व्यवस्था कडक केली. दरम्यान, बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागलीच वनविभागाला पाचारण करण्यात आलं.
जंगलांवर माणसांनी केलेल्या अतिक्रमणाचा परिणाम म्हणून जंगलातले प्राणी शहरी भागांमध्ये घुसण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आरे वसाहत, गोरेगाव, पवई परिसरामध्ये अनेक वेळा अशा प्रकारे बिबट्या घुसण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच रविवारी अंधेरीच्या गार्डन लेन बिल्डिंगमध्ये बिबट्या घुसल्याची घटना घडल्यामुळे एकंदरीतच वन्य प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.